अर्थसंकल्पापूर्वी महागाईचा झटका, एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत वाढ

नवी दिल्ली, 01 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. तेल कंपन्यांनी 19 किलोंच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत 14 रुपयांची वाढ केली आहे. ही दरवाढ आजपासून लागू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, आजच्या दिवशी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होत आहे, त्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे देशातील व्यवसायिकांना पुन्हा एकदा झटका बसला आहे. तत्पूर्वी, गेल्या महिन्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर 1.50 रुपयांनी वाढले होते.

इतक्या रुपयांची वाढ झाली

हे नवीन दर लागू झाल्यामुळे दिल्लीत 19 किलोंचा व्यावसायिक सिलिंडर आता 1755.50 रुपयांऐवजी 1769.50 रुपयांना मिळणार आहे. मुंबईत व्यावसायिक सिलेंडरचा दर आता 1708.50 रुपयांवरून 1723.50 रुपयांवर पोहोचला आहे. कोलकातामध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 1869 रुपायांवरून 1887 रुपये इतकी झाली आहे. तर चेन्नईत व्यावसायिक गॅस सिलिंडर हा 1924.50 रुपयांवरून 1937 रुपये इतका झाला आहे. या दरवाढीमुळे हॉटेलमधील जेवण महागणार आहे. तसेच त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात बदल नाही!

दरम्यान, 14 किलोंच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. देशात घरगुती गॅसच्या किंमतीत अखेरचा बदल 30 ऑगस्ट 2023 रोजी झाला होता. सध्या दिल्लीत घरगुती सिलेंडरची किंमत 903 रुपये इतकी आहे. तर मुंबईत घरगुती गॅस सिलिंडर 902.50 रुपयांना मिळत आहे. तसेच कोलकत्यात या गॅस सिलिंडरचे दर 929 रुपये आणि चेन्नईत 918.50 इतके आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *