उद्योगपती रतन टाटा पंचतत्वात विलीन झाले, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

मुंबई, 10 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) टाटा समूहाचे ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या पार्थिवावर आज (दि.10) वरळी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. रत्न टाटा यांचे बुधवारी (दि.09) रात्री मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले होते. त्यांनी वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांचे पार्थिव मुंबईतील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्सच्या (एनसीपीए) मैदानावर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यावेळी रतन टाटा यांचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती.

https://x.com/ANI/status/1844348516124197161?t=y_na-X4b2afjcqG9_CadNQ&s=19

https://x.com/ANI/status/1844343972304707655?t=rMNW3BLrwjUgynEx34SrzA&s=19

वरळीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार

त्यानंतर रतन टाटा यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी वरळी येथील स्मशानभूमीत आणण्यात आले. यावेळी क्रीडा, उद्योग, राजकारण आणि मनोरंजन जगतातील अनेक मान्यवरांनी रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण केली. उद्योगपती रतन टाटा यांना अखेरचा निरोप देण्यासाठी वरळी येथील स्मशानभूमी याठिकाणी केंद्र सरकारच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आले होते. तसेच येथे केंद्रीय मंत्री पियुष गोयल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कार करण्यापूर्वी त्यांना मुंबई पोलिसांकडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.

अनेक मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली

तत्पूर्वी, रतन टाटा यांचे पार्थिव आज सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास एनसीपीए मैदानावर शेवटच्या अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. जिथे विविध विभागातील हजारो लोक त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आले होते. यावेळी रतन टाटा यांच्या अंतिम दर्शनासाठी लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. याठिकाणी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, उदय सामंत, शरद पवार, सुप्रिया सुळे, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, पियुष गोयल आणि आशिष शेलार या नेत्यांसह भारताचे माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी एनसीपीएच्या मैदानावर जाऊन रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली. याशिवाय रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यासह त्यांचे कुटुंबीय एनसीपीए मैदानावर आले होते. तसेच अभिनेता अमीर खान, दिग्दर्शिका किरण राव यांच्यासह अनेक दिग्गज व्यक्तींनी रतन टाटा यांचे शेवटचे दर्शन घेऊन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *