मायक्रोसॉफ्टच्या तांत्रिक बिघाडामुळे इंडिगोचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान

दिल्ली, 21 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमधील बिघाडाचा परिणाम जगातील सर्वच देशांमध्ये दिसून आला. याचा सर्वाधिक फटका विमान कंपन्यांना बसला. जगभरात विमानसेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे विमान कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. या बिघाडाचा फटका भारतातील विमान कंपन्यांना देखील बसला. देशातील सर्वात मोठी एअरलाईन्स कंपनी इंडिगोच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे कंपनीचे सुमारे 5300 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

स्टॉक मार्केटमध्ये 4 टक्क्यांची घसरण

मायक्रोसॉफ्ट मधील मोठ्या तांत्रिक बिघाडामुळे इंडिगो कंपनीचे शेअर्स शुक्रवारी सुमारे 4 टक्क्यांनी घसरून 4,251 रुपयांवर आले, जे दिवसाच्या सुरूवातीला उच्चांकावर 4,415 रुपये होते. त्यामुळे इंडिगो कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.65 लाख कोटी रुपयांच्या खाली घसरले आहे. गेल्या 10 दिवसांत इंडिगोचे शेअर्स जवळपास 8 टक्क्यांनी खाली आले आहेत.

इंडिगोचे 5300 कोटींचे नुकसान

शेअर्सच्या या घसरणीमुळे इंडिगो कंपनीचे जवळपास 5300 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. गुरूवारी शेअर बाजार बंद झाला तेव्हा इंडिगोचे एकूण बाजार भांडवल सुमारे 1.70 कोटी रुपये होते. परंतु, शुक्रवारी इंडिगो कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. त्यामुळे एकूण कंपनीचे बाजार भांडवल 1.65 कोटी रुपयांवर खाली आले. या परिस्थितीत इंडिगोचे जवळपास 5300 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

https://x.com/ANI/status/1814529449427169398?s=19

देशातील हवाई वाहतूक सुरळीत

दरम्यान, मायक्रोसॉफ्ट सॉफ्टवेअरच्या प्रणालीत शुक्रवारी तांत्रिक बिघाड झाला आणि जगभरातले व्यवहार ठप्प झाले होते. या तांत्रिक बिघाडाचा जगभरातल्या कोट्यवधी मायक्रोसॉफ्ट वापरकर्त्यांना तसेच बँकिंग सेवा, रुग्णालये आणि विमान वाहतूक यंत्रणेला सर्वात जास्त फटका बसला. देशातल्याही अनेक विमान कंपन्यांना विमानतळांवर मॅन्युअल चेक-इन आणि बोर्डिंग प्रक्रियेचा अवलंब करावा लागला. याबाबत नागरी उड्डाण मंत्रालयाने शनिवारी निवेदन प्रसिद्ध करून हवाई वाहतूक सुरळीत सुरू झाल्याचे आज स्पष्ट केले आहे. सरकारचे विमानतळावरच्या कामकाजावर पूर्ण लक्ष असून विमान कंपन्यांसह प्रवाशांचे नियोजन आणि परतावा यावर देखील पूर्ण नियंत्रण आहे, असे देखील नागरी उड्डाण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

https://x.com/MSFTnews/status/1814682621508514191?s=19

मायक्रोसॉफ्ट कडून निवेदन प्रसिद्ध

तत्पूर्वी, मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याने शुक्रवारी जगभरात खळबळ उडाली होती. तर या बिघाडामुळे ठप्प झालेले जगभरातील कामे आणि व्यवहार शनिवारी पुन्हा पूर्ववत झाल्याचे पाहायला मिळाले. यासंदर्भात कंपनीने एक निवेदन जारी केले आहे. सायबर सुरक्षा फर्म क्राऊडस्ट्राईकच्या सॉफ्टवेअर अपडेटशी संबंधित जागतिक तंत्रज्ञानातील त्रुटीमुळे अंदाजे 8.5 दशलक्ष किंवा 85 लाख मायक्रोसॉफ्ट डिव्हाईसवर परिणाम झाला असल्याचे मायक्रोसॉफ्ट कंपनीने यामध्ये म्हटले आहे. अशा परिस्थितीत मायक्रोसॉफ्ट कंपनीचे शेअर्स खाली घसरले. त्यामुळे कंपनीचे सुमारे 73 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *