दुबई, 04 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) टीम इंडियाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा चार गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. यासह 2023 च्या वनडे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पराभवाचा भारताने बदला घेतला. या संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिलेल्या भारतीय संघाने हा विजय मिळवत सलग तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. विराट कोहली या सामन्याचा मानकरी ठरला. त्याने या सामन्यात 84 धावांची खेळी केली.
https://x.com/BCCI/status/1896962707364196570?t=GOzsxer6OG1Hup8t9NHi2Q&s=19
ऑस्ट्रेलिया – 49.3 षटकांत 264 धावा
दुबईतील या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि यष्टीरक्षक फलंदाज ॲलेक्स कॅरी यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 49.3 षटकांत 264 धावा केल्या. स्मिथने 96 चेंडूत 73 धावा करत संघाचा डाव सावरला, तर कॅरीने 57 चेंडूत 61 धावा केल्या. मात्र, शेवटच्या काही षटकांमध्ये भारताच्या गोलंदाजांनी दमदार पुनरागमन करत ऑस्ट्रेलियाचा डाव गुंडाळला. भारताच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियन फलंदाजांना मोठ्या भागीदाऱ्या करण्यास रोखले. मोहम्मद शमीने सर्वाधिक 3 गडी बाद केले, तर वरूण चक्रवर्ती आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतली.
कोहली अय्यरची भागीदारी
त्यानंतर 265 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरूवात काहीशी खराब झाली. पहिल्या 10 षटकांतच भारताने 43 धावांवर 2 गडी गमावले. मात्र, त्यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी डाव सावरला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 111 चेंडूत 91 धावांची भागीदारी करत भारताला विजयाच्या दिशेने नेले. श्रेयस अय्यरने 62 चेंडूत 45 धावा केल्या, पण त्याचे अर्धशतक हुकले.
विराट कोहली सामनावीर!
विराट कोहलीने संघाचा किल्ला लढवत 98 चेंडूत 84 धावा केल्या. तो शतकाच्या उंबरठ्यावर असताना ॲडम झाम्पाच्या चेंडूवर बाद झाला. मात्र, त्याच्या खेळीमुळे भारताने विजयाचा मजबूत पाया रचला. कोहली बाद झाल्यानंतर केएल राहुल आणि हार्दिक पांड्याने भारतीय डाव सावरला. हार्दिकने 24 चेंडूत 28 धावा करत वेगवान खेळी केली. हार्दिक पांड्या बाद झाल्यामुळे अखेरच्या काही षटकांत सामना रोमहर्षक झाला, पण केएल राहुलने संयमी फलंदाजी करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याचबरोबर भारताने 48.1 षटकांत 6 गडी गमावून 267 धावा करत विजय मिळवला आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.