इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताचा विजय! मालिका 3-1 ने जिंकली

रांची, 26 फेब्रुवारीः (विश्वजीत खाटमोडे) पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या सामन्यात भारताने इंग्लंडचा 5 गडी राखून पराभव केला. या सामन्यातील विजयासह भारताने ही मालिका 3-1 अशी खिशात घातली. या सामन्यात इंग्लंड संघाने प्रथम फलंदाजी करताना 353 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाला केवळ 307 धावा करता आल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या डावात इंग्लंडचा संघ 145 धावांत सर्वबाद झाला. त्यामुळे भारताला या सामन्यात विजयासाठी 192 धावांचे आव्हान मिळाले होते. भारताने हे आव्हान 5 गडी राखून पूर्ण केले.

https://twitter.com/BCCI/status/1762028191844385217?s=19

पाच गडी राखून विजय मिळवला

रांची येथे झालेल्या या कसोटीच्या दुसऱ्या डावात इंग्लंडने भारतासमोर विजयासाठी 192 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी 84 धावांची सलामी दिली. दुसऱ्या डावात भारताकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक 55 धावांची खेळी केली. तर यशस्वी जैस्वाल 37 आणि रवींद्र जडेजाने 4 धावा केल्या. रजत पाटीदार आणि सर्फराज खान हे दोघे खाते न उघडताच बाद झाले. त्यामुळे भारतीय संघ काहीसा अडचणीत आला होता. मात्र त्यानंतर शुभमन गिल नाबाद 52 धावा आणि ध्रुव जुरेलने नाबाद 39 धावा करून भारताला या सामन्यात विजय मिळवून दिला.

ध्रुव जुरेल सामनावीर ठरला!

दुसऱ्या डावात इंग्लंडकडून शोएब बशीरने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर जो रूट आणि टॉम हार्टलीने प्रत्येकी 1 विकेट घेतली. या विजयामुळे भारताने इंग्लंडविरुद्धची 5 सामन्यांची ही कसोटी मालिका 3-1 अशी जिंकली आहे. या सामन्यात भारताचा विकेटकिपर ध्रुव जुरेल याला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला आहे. त्याने या सामन्याच्या पहिल्या डावात 90 धावा आणि दुसऱ्या डावात नाबाद 39 धावांची खेळी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *