पहिल्या कसोटीत भारताचे न्यूझीलंडसमोर 107 धावांचे लक्ष्य

बंगळुरू, 19 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना सध्या बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळविण्यात येत आहे. या सामन्यातील चौथ्या दिवसाचा खेळ आज पावसामुळे लवकर समाप्त झाला. या सामन्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. या सामन्यात भारताने न्युझीलंडसमोर विजयासाठी 107 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. यावेळी भारतीय संघाने आपल्या दुसऱ्या डावात 462 धावा केल्या. न्यूझीलंडचे टॉम लॅथम आणि डेव्हन कॉनवे हे सध्या खेळपट्टीवर आहेत. त्यामुळे या कसोटीत विजय मिळवायचा असेल तर उद्याच्या दिवशी न्यूझीलंडला 107 धावांचे लक्ष्य पार करावे लागणार आहे. तसेच भारताला सामना जिंकायचा असल्यास त्यांना न्यूझीलंडचे 10 फलंदाज 107 धावांच्या आधी बाद करावे लागणार आहे. त्यामुळे उद्याच्या दिवशी कोणता संघ आपली कामगिरी उंचावणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

https://x.com/BCCI/status/1847596524185719122?t=eOQ3ZIXukEfk-wX6E8-Hnw&s=19

सरफराज खान आणि रिषभ पंतची 177 धावांची भागीदारी

आजच्या दिवशी भारताच्या सरफराज खान आणि रिषभ पंत यांनी 3 बाद 231 धावसंख्येवरून खेळण्यास खेळण्यास केली. त्यावेळी भारतीय संघ अडचणीत होता. परंतु, सरफराज खान आणि रिषभ पंत यांनी शानदार फलंदाजी करीत भारताचा खेळ सावरला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 177 धावांची भागीदारी केली. या सामन्यात सरफराज खानने 150 धावा केल्या. त्याने या खेळीत 18 चौकार आणि 3 षटकार लगावले. तर यादरम्यान रिषभ पंतचे शतक मात्र हुकले. त्याने 9 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 99 धावा केल्या. त्यानंतर केएल राहुल (12), रवींद्र जडेजा (5), रविचंद्रन अश्विन (15) हे फलंदाज झटपट बाद झाले. त्यामुळे भारताचा दुसरा डाव 462 धावांत संपुष्टात आला आणि भारताने न्यूझीलंडला विजयासाठी 107 धावांचे लक्ष्य दिले. दुसऱ्या डावात न्यूझीलंडकडून मॅट हेन्री आणि विलियम रुर्के यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. तर एजाज पटेलने 2 आणि टीम साऊदी आणि ग्लेन फिलिप्स यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

पहिल्या डावात केवळ 46 धावा

तत्पूर्वी, या कसोटी सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताचा पहिला डाव अवघ्या 46 धावांत संपुष्टात आला. त्यानंतर न्यूझीलंडने आपल्या पहिल्या डावात 402 धावा केल्या. त्यामुळे त्यांना या सामन्यात 356 धावांची मोठी आघाडी मिळविण्यात यश आले. त्यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या डावात शानदार फलंदाजी करीत 462 धावा केल्यामुळे न्यूझीलंडला 107 धावांचे आव्हान मिळाले. उद्या या सामन्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे भारताला या सामन्यात विजय मिळवायचा असेल तर 107 धावांच्या आत न्यूझीलंडचा संपूर्ण संघ बाद करावा लागणार आहे. तसेच उद्या पावसाच्या परिस्थितीवर देखील लक्ष असणार आहे. त्यामुळे या सामन्याचा निकाल कोणाच्या बाजूने लागणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *