सोलापूर, 19 जानेवारीः (विश्वजीत खाटमोडे) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज सोलापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत बांधण्यात आलेल्या रे नगर कुंभारी येथे पहिल्या टप्प्यातील 15 हजार घरांचे लोकार्पण करण्यात आले. तसेच यावेळी सोलापुरात विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे आदी मान्यवर उपस्थित होते.
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1748216518289338719?s=19
दरम्यान, सोलापूर मधील रे नगर कुंभारी येथे प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत देशातील सर्वात मोठा 30 हजार घरांचा प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील 15,024 घरांचे लोकार्पण आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात घरांच्या चाव्या देण्यात आल्या. दरम्यान, ही घरे असंघटित कामगारांसाठी बांधण्यात आली आहेत. कचरा उचलणारे, विडी कामगार, बांधकाम कामगार, वस्त्रोद्योग कामगार इत्यादी असंघटित क्षेत्रातील लाभार्थ्यांसाठी ही घरकुले आहेत. तर हा प्रकल्प 365 एकर जागेवर असून, या प्रकल्पामध्ये एकूण 833 इमारती आहेत. तसेच प्रत्येक इमारतीत 36 घरे आहेत.
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1748250770691223873?s=19
या कार्यक्रमानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अटल अभियान अमृत 2.0 या योजनेतंर्गत घरोघरी पाणीपुरवठा आणि सांडपाणी व्यवस्थापनाच्या 1201 कोटी रुपयांच्या 7 प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात आले. यामध्ये कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, सांगली या महानगरपालिका तसेच सातारा, शेगाव, भद्रावती या नगरपालिकांच्या पाणीपुरवठा व मलनिःस्सारण या प्रकल्पांचा समावेश असणार आहे. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पीएम स्वनिधी योजनेंतर्गत राज्यातील 50 हजार पथविक्रेत्यांना पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याचे ऑनलाईन वितरण करण्यात आले. यावेळी ह्या पथ विक्रेत्यांना प्रातिनिधिक स्वरूपात धनादेशाचे वाटप करण्यात आले.