न्यूयॉर्क, 05 जून: (विश्वजीत खाटमोडे) आयसीसी टी-20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि आयर्लंड यांच्यात सामना झाला. न्यूयॉर्कमध्ये झालेल्या या सामन्यात भारताने आयर्लंड संघाचा 8 गडी राखून पराभव केला. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. यावेळी प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या आयर्लंड संघातील एकाही फलंदाजांचा भारतीय गोलंदाजीपुढे निभाव लागला नाही. या सामन्यात आयर्लंड संघ 96 धावांवर सर्वबाद झाला. त्यानंतर भारतीय संघाने हे लक्ष 12.2 षटकांत 2 गडी गमावून पूर्ण केले. भारताचा या स्पर्धेतील हा पहिलाच विजय आहे. या सामन्यात भारताकडून रोहित शर्माने सर्वाधिक 52 धावा केल्या. गोलंदाजीत हार्दिक पांड्याने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. तसेच मोहम्मद सिराज आणि अक्षर यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
https://twitter.com/BCCI/status/1798404247018745856?s=19
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडचा डाव 16 षटकांत 96 धावांत संपुष्टात आला. यामध्ये आयर्लंड संघाकडून गॅरेथ डेलेनीने सर्वाधिक 26 धावा केल्या. तत्पूर्वी, आयर्लंडची सुरूवात अतिशय खराब झाली. डावाच्या तिसऱ्या षटकात अर्शदीप सिंगने कर्णधार पॉल स्टर्लिंग (02) आणि अँड्र्यू बालबर्नी (05) यांच्या विकेट घेतल्या. या धक्क्यातून आयर्लंडचा संघ शेवटपर्यंत सावरला नाही. त्यानंतर हार्दिक पांड्याने भेदक गोलंदाजी करून त्यांच्या लॉर्कन टकर (10), कर्टिस कान्फर (12) आणि मार्क एडेअर (3) या फलंदाजांना बाद केले. तसेच जसप्रीत बुमराहने हॅरी टेक्टर (4) आणि जोशुआ लिटल (14) यांची विकेट घेतली. तर अक्षर पटेलने बॅरी मॅककार्थी याची विकेट घेतली. या सामन्यात गॅरेथ डेलानी हा 26 धावांवर असताना धावबाद झाला. अशाप्रकारे आयर्लंडचा डाव 16 षटकांत 96 धावांत संपुष्टात आला.
या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरूवात खराब झाली. संघाची धावसंख्या 22 असताना तिसऱ्या षटकात मार्क एडेअरने विराट कोहलीला बाद केले. विराट 5 चेंडूत 1 धावा करून बाद झाला. त्यानंतर या सामन्यात रोहित शर्माने कर्णधाराला साजेशी अशी 37 चेंडूत 52 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 4 चौकार आणि 3 षटकार लगावले. मात्र, अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर रोहित शर्मा रिटायर हर्ट झाला. त्यानंतर आलेला सूर्यकुमार यादव फारसा काही करू शकला नाही. या सामन्यात सूर्यकुमार यादव 2 धावांवर बाद झाला. तेंव्हा रिषभ पंतने षटकार मारत भारताचा विजय निश्चित केला. यावेळी रिषभ पंतने 26 चेंडूत नाबाद 36 धावांची खेळी केली. दरम्यान या सामन्यात जसप्रीत बुमराहला प्लेअर ऑफ मॅचचा पुरस्कार देण्यात आला. यावेळी बुमराहने 3 षटकांत 6 धावा देऊन 2 विकेट घेतल्या. तसेच त्याने एक षटक निर्धाव टाकले.