पॅरिस, 03 सप्टेंबर: (विश्वजीत खाटमोडे) पॅरिस पॅराऑलिम्पिक 2024 स्पर्धेत भारताचा भालाफेकपटू सुमित अंतिल याने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. सुमितने पॅरिस पॅराऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. त्याने यापूर्वी टोकियो पॅरालिम्पिकमध्येही सुवर्णपदक जिंकले होते. पॅराऑलिम्पिक स्पर्धेत दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकण्याची कामगिरी सुमित अंतिल याने केली आहे. त्याच्या या कामगिरीबाबत त्याचे सध्या कौतुक केले जात आहे.
https://x.com/ANI/status/1830669618115158203?s=19
70.59 मीटरचा भाला फेकत सुवर्णपदक पटकावले
सुमित अंतिलने यंदाच्या पॅरालिम्पिक स्पर्धेत F64 पुरूषांच्या भालाफेक मध्ये भारतासाठी सुवर्णपदक पटकावले आहे. त्याने टोकियोनंतर आता पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये देखील सुवर्णपदक पटकावण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे. यावेळी सुमित अँटीलने भालाफेक F64 प्रकारात 70.59 मीटर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले. तर याआधी त्याने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये 68.55 मीटरचा भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले होते. दुसरीकडे या भालाफेक स्पर्धेत श्रीलंकेच्या दुलन कोडिथुवाक्कूने 67.03 च्या प्रयत्नात रौप्यपदक जिंकले. तर ऑस्ट्रेलियाच्या मायकेल बुरियनने 64.89 मीटरच्या प्रयत्नात कांस्यपदक जिंकले. दरम्यान, पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये भारताने आतापर्यंत 14 पदके जिंकली आहेत. यामध्ये 3 सुवर्ण, 5 रौप्य आणि 6 कांस्य पदकांचा समावेश आहे.
https://x.com/narendramodi/status/1830670849101439412?s=19
मोदींनी केले कौतुक!
पॅरिस पॅरालिम्पिक मधील त्याच्या या विक्रमी कामगिरीबद्दल पंतप्रधान मोदी यांनी सुमितचे अभिनंदन केले आहे. यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर लिहिले की, “सुमितची विलक्षण कामगिरी! पुरूषांच्या भालाफेक F64 स्पर्धेत सुवर्ण जिंकल्याबद्दल त्याचे अभिनंदन! त्याने कमालीचे सातत्य आणि उत्कृष्टता दाखवली आहे. त्याच्या आगामी प्रयत्नांसाठी खूप खूप शुभेच्छा.”