मुंबई, 05 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) आयसीसी टी-20 विश्वचषक क्रिकेट 2024 स्पर्धेच्या विजेत्या भारतीय संघातील महाराष्ट्राच्या खेळाडूंचा आज राज्य सरकारच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, सुर्यकूमार यादव, यशस्वी जयस्वाल, शिवम दुबे, गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे, संघ व्यवस्थापक अरूण कानडे यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात पार पडला. विशेष म्हणजे, विधानभवनात पहिल्यांदाच अशा प्रकारचा विशेष समारंभ पार पडला आहे. यावेळी उपस्थित खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ मधील सदस्यांना शाल, पुष्पगुच्छ, विशेष मानचिन्ह आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच याप्रसंगी महाराष्ट्र सरकारच्या वतीने भारतीय संघासाठी अकरा कोटी रुपयांचे विशेष पारितोषिक देखील जाहीर करण्यात आले.
https://x.com/mieknathshinde/status/1809238621976957144?s=19
या विशेष कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्यासह दोन्ही विधिमंडळ सभागृहातील सदस्य आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांकडून खेळाडूंचे कौतुक
भारत हा क्रिकेटमध्ये विश्वगुरू आहे. हे आपल्या टी-20 विश्वचषक विजेत्या संघाने सिद्ध केले आहे. पराभवाच्या छायेतून विजयश्री खेचून आणून, कर्णधार रोहित शर्मा आणि त्याच्या संघाने भारतीयांची छाती अभिमानाने फुलून यावी अशी कामगिरी केली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या खेळाडूंचे कौतुक केले. तसेच मुंबई महानगर प्रदेशात भविष्यात भव्य आणि आधुनिक असे स्टेडियम उभारण्यास गती देण्यात येईल असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
मुंबई पोलिसांचे अभिनंदन
सोबतच मुख्यमंत्र्यांनी मुंबई पोलिसांचे देखील कौतुक केले आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारतीय क्रिकेट संघाच्या स्वागतावेळी जो प्रचंड जनसमुदाय जमला होता. त्यावेळी गर्दीचे योग्य नियोजन केल्याबद्दल मी मुंबई पोलिसांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. इतक्या मोठ्या गर्दीला नियंत्रण करणे हे मोठे आव्हान होते, तरीही मुंबई पोलिसांनी योग्य नियोजन करीत कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू दिली नाही हे खरोखर कौतुकास्पद आहे. असे मुख्यमंत्री म्हणाले.