इंदोर, 14 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा 6 गडी राखून पराभव केला आहे. त्यामुळे भारतीय संघाने 3 सामन्यांची ही टी-20 मालिका 2-0 अशी जिंकली आहे. या सामन्यात अफगाणिस्तानने भारताला 173 धावांचे लक्ष्य दिले होते. त्यांचे हे लक्ष्य भारतीय संघाने 15.4 षटकांत 4 गडी गमावून पूर्ण केले. यावेळी भारताच्या शिवम दुबेने सलग दुसरे अर्धशतक झळकावले. त्याने या सामन्यात नाबाद 64 धावांची खेळी केली. तर यशस्वी जैस्वाल याने देखील शानदार 68 धावा केल्या. त्यामुळे भारतीय संघाला विजय साकारता आला.
https://twitter.com/BCCI/status/1746573685375533451?s=19
अफगाणिस्तानचे भारतासमोर 173 धावांचे लक्ष्य
तत्पूर्वी इंदोरच्या या मैदानावर भारताचा कर्णधार रोहित शर्माने पुन्हा एकदा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी अफगाणिस्तान संघाने 20 षटकांत सर्व गडी गमावून 172 धावा केल्या. अफगाणिस्तान संघाकडून गुलबदिन नायबने 35 चेंडूत सर्वाधिक 57 धावांची खेळी केली. त्यानंतर नजीबुल्लाहने 21 चेंडूत 23 धावा केल्या. तसेच करीम जन्नतने 10 चेंडूत 20 धावा आणि मुजीब उर रहमानने 9 चेंडूत 21 धावांची वेगवान खेळी केली. अफगाणिस्तानच्या या फलंदाजांनी अखेरच्या काही षटकांत केलेल्या फटकेबाजीमुळे त्यांना भारतासमोर 173 धावांचे आव्हान ठेवता आले. भारताकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक 3 गडी बाद केले. तसेच रवी बिश्नोई आणि अक्षर पटेल यांना प्रत्येकी 2 आणि शिवम दुबेने 1 गडी बाद केला.
https://twitter.com/BCCI/status/1746566166548787433?s=19
https://twitter.com/BCCI/status/1746567122552324565?s=19
शिवम दुबेचे सलग दुसरे अर्धशतक!
त्यानंतर प्रत्युत्तरात खेळण्यासाठी आल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्याला फजलहक फारुकीने बोल्ड आऊट केले. त्यानंतर यशस्वी जैस्वाल आणि विराट कोहली यांनी अप्रतिम फलंदाजी केली. मात्र काही वेळातच विराट कोहली 16 चेंडूत 29 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल यांनी फटकेबाजी केलीच, शिवाय त्यांनी या सामन्यात मोठी भागीदारी देखील केली. या सामन्यात शिवम दुबेने 32 चेंडूत 63 धावांची नाबाद खेळी केली. शिवम दुबेचे हे सलग दुसरे अर्धशतक आहे.
https://twitter.com/BCCI/status/1746576596436385794?s=19
यशस्वी जैस्वालची तुफान फटकेबाजी
तसेच यशस्वी जैस्वालने देखील 34 चेंडूत शानदार 68 धावा केल्या. या दोघांनी यावेळी चौकार आणि षटकारांची अक्षरशः आतषबाजी केली. त्यामुळे भारताला हा सामना लवकर संपवता आला. या सामन्यात अफगाणिस्तान कडून करीम जनत याने 2, तर फजलहक फारूकी आणि नवीन-उल-हक यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. दरम्यान, भारताच्या अक्षर पटेलला यावेळी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला आहे. त्याने या सामन्यात 4 षटकांत केवळ 17 धावा देऊन अफगाणिस्तानचे 2 गडी बाद केले होते.