केपटाऊन, 04 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सात गडी राखून पराभव केला आहे. त्यामुळे भारताला दोन सामन्यांची ही कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडविण्यात यश आले आहे. ही कसोटी जिंकण्यासाठी भारतीय संघाला आफ्रिकेने 79 धावांचे लक्ष्य दिले होते. त्यांचे हे लक्ष्य भारतीय संघाने 3 विकेट गमावून पूर्ण केले. त्यामुळे केपटाऊन मध्ये खेळविण्यात येणारी ही कसोटी जिंकून भारताने इतिहास रचला आहे. भारतीय संघाचा या मैदानावरील पहिलाच विजय आहे.
https://twitter.com/BCCI/status/1742877107683053694?s=19
इतिहासातील सर्वात लहान कसोटी सामना
दरम्यान, हा कसोटी सामना दुसऱ्याच दिवशी समाप्त झाला आहे. त्यामुळे कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील हा सर्वात लवकर संपणारा सामना ठरला आहे. हा कसोटी सामना केवळ 642 चेंडूत संपला आहे. यापूर्वी 1932 मध्ये दक्षिण आफ्रिका विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेला कसोटी सामना 656 चेंडूत समाप्त झाला होता.
https://twitter.com/BCCI/status/1742879046588133804?s=19
पहिल्या डावात आफ्रिका 55 धावांत ऑलआऊट
तत्पूर्वी, या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 55 धावांत संपुष्टात आला. या डावात भारताकडून मोहम्मद सिराजने 6 विकेट घेतल्या. त्यानंतर खेळण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने त्यांच्या पहिल्या डावात 153 धावा केल्या. यामध्ये भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक 46 धावांची खेळी केली.
https://twitter.com/BCCI/status/1742886915295330746?s=19
आफ्रिकेचे भारतापुढे 79 धावांचे लक्ष्य!
त्यानंतर या कसोटीच्या दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेचा संघ 173 धावांत संपुष्टात आला. यामध्ये आफ्रिकेच्या एडन मार्करमने 103 चेंडूत 106 धावांची शानदार खेळी केली. भारताकडून जसप्रीत बुमराहने 6 विकेट घेतल्या. तर मुकेश कुमारने 2 आणि प्रसिध कृष्णा व मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी विकेट घेतली. त्यामुळे भारताला विजयासाठी 79 धावांचे आव्हान मिळाले. त्यानंतर भारताने हा कसोटी सामना 7 गडी राखून जिंकला.
https://twitter.com/ICC/status/1742840100273418671?s=19
बुमराह आणि एल्गर ठरले मालिकावीर
दरम्यान, भारताच्या मोहम्मद सिराज याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. त्याने या सामन्यात 7 विकेट घेतल्या. तसेच आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर आणि जसप्रीत बुमराह यांना मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला आहे. या मालिकेत डीन एल्गरने 201 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या पहिल्या कसोटीतील 185 धावांच्या खेळीचा समावेश आहे. तर दुसरीकडे या मालिकेत भारताच्या जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 12 विकेट घेतल्या आहेत.