भारताने अफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका जिंकली

पार्ल, 22 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) भारतीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत विजय मिळवला आहे. भारताने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात आफ्रिकेचा 78 धावांनी पराभव केला आहे. त्यामुळे भारताने 3 सामन्यांची ही मालिका 2-1 ने जिंकली. पार्लच्या बोलँड पार्क येथे झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत आफ्रिकेसमोर विजयासाठी 297 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र प्रत्युत्तरात आफ्रिकेचा संघ 45.5 षटकांत 218 धावा करून बाद झाला.

https://twitter.com/BCCI/status/1737927489564127595?s=19

भारतातर्फे संजू सॅमसनने 108 धावांची खेळी केली. त्यामुळे त्याला या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी भारताच्या डावाची सुरूवात चांगली झाली. यावेळी ह्या सामन्यात भारतीय संघात संधी मिळालेला रजत पाटीदार याने 22 आणि दुसरा सलामीवीर साई सुदर्शनने 10 धावा केल्या. मात्र हे दोघे लागोपाठ बाद झाले. त्यानंतर संजू सॅमसन आणि कर्णधार केएल राहुल यांनी भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.



मात्र त्याचवेळी राहुल 21 धावा करून बाद झाला. त्यानंतर संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांनी 135 चेंडूत 116 धावांची भागीदारी करून भारताची धावसंख्या 200 च्या पुढे नेली. या सामन्यात संजू सॅमसनने 108 धावा केल्या. सोबतच तिलक वर्माने देखील 52 धावांची खेळी केली. ते दोघे बाद झाल्यावर रिंकू सिंगने 27 चेंडूत 38 धावा करून भारताची धावसंख्या 300 च्या जवळ नेली. त्यावेळी भारताने 50 षटकात 8 बाद 296 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून ब्युरेन हेंड्रिक्सने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर नांद्रे बर्गरने 2, लिझार्ड विल्यम्स, व्हियान मुल्डर आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

प्रत्युत्तरात खेळताना दक्षिण आफ्रिकेची देखील चांगली सुरूवात झाली. आफ्रिकेने या सामन्यात पहिल्या विकेटसाठी 8.2 षटकात 59 धावांची दमदार भागीदारी केली. त्यानंतर आफ्रिकेच्या 76 धावांत 2 विकेट पडल्या. यामध्ये रीझा हेंड्रिक्स 19, रॅसी व्हॅन डर ड्युसेन 2 करून बाद झाले. या सामन्यात अफ्रिकेतफे टोनी डी जॉर्जी याने सर्वाधिक 81 धावांची खेळी केली. त्याला कर्णधार एडन मार्करमने 36 धावा करून चांगली साथ दिली. या दोघांनी 65 धावा करून आफ्रिकेचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.

मात्र हे दोघे बाद झाल्यावर आफ्रिकेचा डाव गडगडला. त्यानंतरचे फलंदाज फारशी चांगली कामगिरी करू शकले नाहीत. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा डाव 218 धावांत संपुष्टात आला. परिणामी भारताने हा सामना 78 धावांनी जिंकला. या सामन्यात भारताकडून अर्शदीप सिंगने सर्वधिक 4 विकेट घेतल्या. सोबतच आवेश खान आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी 2, तर मुकेश कुमार आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. यावेळी अर्शदीप सिंगला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला. त्याने 3 सामन्यांच्या या मालिकेत 10 विकेट घेतल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *