भारताने 17 वर्षानंतर टी-20 विश्वचषकावर नाव कोरले! विराट-रोहितची निवृत्ती

बार्बाडोस, 30 जून: (विश्वजीत खाटमोडे) आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला. त्याचबरोबर भारताने दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषकावर आपले नाव कोरले. बार्बाडोस येथे शनिवारी रात्री खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 गडी गमावून 176 धावा केल्या. तर प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेला 20 षटकांत आठ गडी गमावून 169 धावा करता आल्या. त्याचबरोबर भारताने 17 वर्षांनंतर टी-20 विश्वचषक जिंकला आहे. याच्याआधी भारतीय संघाने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात खेळताना 2007 मध्ये टी-20 विश्वचषक जिंकला होता.

https://x.com/BCCI/status/1807134994613362715?s=19

https://x.com/BCCI/status/1807119448337424817?s=19

विराट कोहलीची 76 धावांची खेळी

तत्पूर्वी, या सामन्यात भारताने फलंदाजी करताना 20 षटकांत 7 गडी गमावून 176 धावा केल्या. यामध्ये विराट कोहलीने 59 चेंडूत सर्वाधिक 76 धावा केल्या. तर अक्षर पटेलने 31 चेंडूत 47 धावांची खेळी केली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 72 धावांची शानदार भागीदारी केली. त्यानंतर शिवम दुबेनेही कोहलीला साथ दिली. शिवम दुबे आणि विराट कोहली यांनी पाचव्या विकेटसाठी 33 चेंडूत 57 धावांची भागीदारी केली. या सामन्यात शिवम दुबे 27 धावा करून बाद झाला. फलंदाजांच्या या कामगिरीमुळे भारताला आफ्रिकेसमोर 177 धावांचे लक्ष्य ठेवता आले. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून केशव महाराज आणि ॲनरिक नोर्टजे यांनी प्रत्येकी 2, तर मार्को यानसेन आणि कगिसो रबाडा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

हार्दिक पांड्याच्या 3 विकेट

त्यानंतर या सामन्यात 177 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने 20 षटकांत 8 गडी गमावून 169 धावा केल्या. यामध्ये दक्षिण आफ्रिकेकडून हेनरिक क्लासेनने 27 चेंडूत सर्वाधिक 52 धावांची खेळी केली. क्विंटन डी कॉकने 31 चेंडूत 39 धावा करून बाद झाला. त्यानंतर ट्रिस्टन स्टब्सने 31 धावा आणि डेव्हिड मिलरने 21 धावा केल्या. तर या सामन्यात भारताकडून हार्दिक पांड्याने 3 विकेट, अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. तर अक्षर पटेलने एक विकेट घेतली. विराट कोहली या सामन्याचा मानकरी ठरला. तर जसप्रीत बुमराह हा मालिकावीर ठरला आहे.

https://x.com/BCCI/status/1807106330957885727?s=19

हेनरिक क्लासेनचे वेगवान अर्धशतक

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेच्या हेनरिक क्लासेनने डावातील अक्षर पटेलच्या 15 व्या षटकात 24 धावा काढल्या. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 30 चेंडूत 30 धावा हव्या होत्या. त्यामुळे भारत हा सामना हरतो की काय? असेच वाटत होते. परंतु, डावाच्या 17 व्या षटकांत हार्दिक पांड्याने हेनरिक क्लासेनची विकेट घेऊन हा सामना भारताच्या पारड्यात टाकला. त्यावेळी हेनरिक क्लासेन 27 चेंडूत 52 धावा करून बाद झाला. त्यानंतर शेवटच्या षटकात भारताने हा सामना 7 धावांनी जिंकला. त्याचबरोबर कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने 2024 च्या टी-20 विश्वचषकावर आपले नाव कोरले. त्यामुळे सध्या भारतात जल्लोषाचे आणि आनंदाचे वातावरण आहे.

https://x.com/BCCI/status/1807138554461737305?s=19

विराट-रोहित टी-20 मधून निवृत्त!

या सामन्यानंतर विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यातून निवृत्ती जाहीर केली आहे. सर्वप्रथम विराट कोहलीने सांगितले की, हा त्याचा शेवटचा टी-20 क्रिकेट सामना होता. त्यानंतर रोहित शर्माने ही आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. विराट कोहलीने भारताकडून 125 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले आहेत. या सामन्यांत त्याने 48.69 च्या सरासरीने आणि 137.04 च्या स्ट्राईक रेटने 4188 धावा केल्या. यामध्ये एका शतकासह 38 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच रोहित शर्माने भारताकडून 159 सामने खेळले आहेत. या सामन्यांत त्याने 32.05 च्या सरासरीने आणि 140.89 च्या स्ट्राइक रेटने 4231 धावा केल्या आहेत. यामध्ये रोहित शर्माच्या नावावर 5 शतके आणि 32 अर्धशतके आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *