मुंबई, 2 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि श्रीलंका यांच्यात सामना होणार आहे. हा सामना दुपारी 2 वाजता मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहे. या विश्वचषकात भारतीय संघ जबरदस्त फॉर्मात आहे. भारताने आपले सर्व 6 सामने जिंकले आहेत. यामध्ये भारताने ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, न्यूझीलंड आणि इंग्लंड या संघांचा पराभव केला आहे. त्यामुळे भारतीय संघ सध्या गुणतालिकेत 12 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर श्रीलंका संघाने या विश्वचषकात निराशाजनक प्रदर्शन केले आहे. श्रीलंकेने या स्पर्धेत 6 सामन्यांत 2 विजय मिळवले आहेत. तर 4 सामन्यांत त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. गेल्या सामन्यात श्रीलंकेचा अफगाणिस्तानने 7 गडी राखून पराभव केला होता. या कामगिरीमुळे श्रीलंकेचे या विश्वचषकातील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. तर दुसरीकडे मात्र, भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी एक पाऊल दूर आहे.
https://twitter.com/cricketworldcup/status/1719889721952793002?s=19
आशा सेविकांची दिवाळी होणार गोड; राज्य सरकारचा मोठा निर्णय
दरम्यान, आजचा सामना वानखेडे स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहे. या मैदानाची खास आठवण म्हणजे, 2011 च्या विश्वचषकातील अंतिम फेरीत भारतीय संघाने श्रीलंकेला हरवून दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकला होता. त्यामुळे श्रीलंकेच्या संघाची सध्याची कामगिरी पाहता आजचा सामना देखील भारतीय संघ जिंकणार असल्याचा अंदाज भारतीय क्रिकेट चाहते करीत आहेत. तर वानखेडे स्टेडियमवरील खेळपट्टी ही फलंदाजांसाठी उपयुक्त आहे.
दहावी-बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
या स्पर्धेत वानखेडे स्टेडियमवर काही सामने झाले होते. या सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 399 आणि 382 धावा केल्या होत्या. त्यामुळे आजच्या सामन्यात देखील मोठी धावसंख्या होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तत्पूर्वी, आजच्या सामन्यात देखील भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या हा खेळणार नाही. त्यामुळे गेल्या दोन सामन्यांप्रमाणेच भारतीय संघात कोणताही बदल केला जाणार नाही. दरम्यान हार्दिकला न्युझीलंड विरुद्धच्या सामन्यात खेळताना दुखापत झाली होती. त्यामुळे तो सध्या या दुखापतीवर उपचार घेत आहे. तर त्याची ही दुखापत लवकर बरी व्हावी, यासाठी भारतीय क्रिकेट चाहते प्रार्थना करीत आहेत.
One Comment on “आज भारत विरुद्ध श्रीलंका सामना”