पुणे, 24 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना आजपासून (दि.24) खेळविण्यात येत आहे. हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात तीन महत्त्वपूर्ण बदल करण्यात आहेत. या सामन्यात केएल राहुल, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांच्याजागी शुभमन गिल, आकाशदीप आणि वॉशिंग्टन सुंदर यांना खेळण्याची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे या तिघांच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे. त्याचवेळी न्यूझीलंड संघात एक बदल करण्यात आला आहे. दुखापतीमुळे मॅट हेन्रीच्या जागी मिचेल सँटनरला संधी मिळाली आहे.
https://x.com/BCCI/status/1849293308566392888?t=SPBhVHeYxsV9-XTdE4LaQQ&s=19
न्यूझीलंडची मालिकेत आघाडी
तत्पूर्वी, तीन सामन्यांच्या या कसोटी मालिकेत न्यूझीलंडचा संघ सध्या 1-0 ने आघाडीवर आहे. बंगळुरू येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे मालिकेतील बरोबरी साधण्यासाठी भारतीय संघाला या कसोटीत विजय मिळवणे आवश्यक आहे. तसेच या मालिकेतील पुढील दोन सामने जिंकून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी आपले समीकरण सोपे करण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असणार आहे. तर दुसरीकडे, हा सामना जिंकून मालिका 2-0 ने जिंकण्याचे न्यूझीलंडचे लक्ष्य असेल.
खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना मदत?
हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर खेळवला जात आहे. या मैदानावरील खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे. या खेळपट्टीवर चेंडू जसजसा जुना होईल तसतशी फिरकीपटूंची भूमिका महत्त्वाची होईल. ही परिस्थिती लक्षात घेऊन भारतीय संघाने आपल्या संघात रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन आणि वॉशिंग्टन सुंदर या फिरकी गोलंदाजांना संधी दिली आहे. तर न्यूझीलंडकडे देखील मिशेल सॅंटनर आणि एजाझ पटेल हे फिरकी गोलंदाज आहेत. त्यामुळे या कोणत्या संघातील फिरकी गोलंदाज वरचढ ठरतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सामना कोठे दिसणार?
या सामन्याचे थेट प्रक्षेपण सकाळी 9:30 वाजल्यापासून स्पोर्ट्स18 चॅनलवर करण्यात येत आहे. तसेच जिओ सिनेमा या ओटीटी ॲपवरून देखील हा सामना लाईव्ह पाहता येणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहते मोबाईल आणि टीव्ही वरून देखील या सामन्याचा आनंद घेऊ शकतात.
https://x.com/BCCI/status/1849293804614152648?t=Kwg3N0WgpuCo1rzog4NY1g&s=19
दोन्ही संघाचे निवड झालेले 11 खेळाडू –
भारतीय संघ:- यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, रिषभ पंत (यष्टीरक्षक), सरफराज खान, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप आणि जसप्रीत बुमराह.
न्यूझीलंड संघ:- टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, टिम साऊदी, मिचेल सँटनर, एजाज पटेल आणि विल्यम ओ’रुर्के.