हैदराबाद, 26 जानेवारीः (विश्वजीत खाटमोडे) भारत आणि इंग्लंड यांच्यातील हैदराबाद मधील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ आज समाप्त झाला. यावेळी दुसऱ्या दिवसाअखेर भारताने 7 गडी गमावून 421 धावा केल्या. सध्या भारताचे रवींद्र जडेजा 81 आणि अक्षर पटेल 35 धावांवर खेळत आहेत. तर इंग्लंडने त्यांच्या पहिल्या डावात 246 धावा केल्या होत्या. भारताकडे सध्या 175 धावांची आघाडी आहे.
https://twitter.com/BCCI/status/1750845894747201867?s=19
यशस्वी जैस्वालची 80 धावांची खेळी
तत्पूर्वी, 1 बाद 119 धावसंख्येपासून भारताच्या डावाची सुरूवात झाली. दुसऱ्या दिवसाची सुरुवात होताच जो रूटने भारताच्या यशस्वी जैस्वालला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. जैस्वालने दिवसाच्या पहिल्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला, चेंडू बॅटच्या काठाला लागला आणि रूटने त्याचा झेल घेतला. यशस्वी जैस्वालने 74 चेंडूत 80 धावा केल्या. त्यानंतर शुभमन गिल 23 धावा करून बाद झाला. तो बाद झाल्यावर श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांनी चांगली फलंदाजी केली. मात्र उपाहारानंतरच्या दुसऱ्याच षटकात श्रेयस अय्यर डीप मिड-विकेटवर स्विप मारण्याच्या प्रयत्नात झेल बाद झाला. त्याने 63 चेंडूत 35 धावा केल्या.
केएल राहुल 86 धावांवर बाद झाला
त्यानंतर रवींद्र जडेजा फलंदाजीला आला. तर दुसरीकडे केएल राहुलने चांगलीच फटकेबाजी चालू ठेवली. यावेळी रवींद्र जडेजा आणि केएल राहुल यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली. मात्र, टॉम हार्टलेच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या नादात राहुल बाद झाला. त्याने 123 चेंडूत 86 धावांची शानदार खेळी केली. परंतू त्याचे शतक हुकले. त्यानंतर भारताचा विकेटकिपर केएस भरतने रवींद्र जडेजा सोबत चांगली फलंदाजी केली. मात्र केएस भरत 81 चेंडूत 41 धावा करून बाद झाला. तो पायचीत बाद झाला. त्यानंतर आर अश्विन 1 धाव घेण्याच्या प्रयत्नात 11 धावांवर धावबाद झाला.
भारताकडे 175 धावांची आघाडी
तो बाद झाल्यावर रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांनी भारताची आणखी विकेट पडू दिली नाही. या दोघांनी शानदार फलंदाजी केल्यामुळे भारताची धावसंख्या दुसऱ्या दिवसाअखेर 7 बाद 421 अशी झाली. सध्या रवींद्र जडेजा 81 आणि अक्षर पटेल 35 धावांवर खेळत आहेत. भारताकडे सध्या 175 धावांची आघाडी आहे. त्यामुळे या कसोटी सामन्यात भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे.