हैदराबाद, 27 जानेवारीः (विश्वजीत खाटमोडे) भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसरा दिवसाचा खेळ आज समाप्त झाला. यावेळी तिसऱ्या दिवसाअखेर इंग्लंडने दुसऱ्या डावात 6 गडी गमावून 316 धावा केल्या आहेत. त्यामुळे इंग्लंडकडे सध्या 125 धावांची आघाडी आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडचा ऑली पोप 148 धावा आणि रेहान अहमद 16 धावांवर नाबाद खेळत आहे. तर भारताकडून जसप्रीत बुमराह आणि आर अश्विनने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या आहेत. तर अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा यांनी एक विकेट घेतली.
https://twitter.com/BCCI/status/1751202963698442587?s=19
टीम इंडियाच्या पहिल्या डावात 436 धावा
तत्पूर्वी, भारताने आज 7 बाद 421 धावांवरून खेळण्यास सुरूवात केली. त्यावेळी पहिल्या सत्रात भारताच्या उर्वरित 3 विकेट लवकर पडल्या. त्यामुळे भारताचा पहिला डाव 436 धावांत संपुष्टात आला. त्यावेळी भारताला 190 धावांची आघाडी मिळाली होती. पहिल्या डावात भारताकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक 87 धावा केल्या. सोबतच केएल राहुल 86 आणि यशस्वी जैस्वालने 80 धावांची खेळी केली. तर अक्षर पटेलने 44 धावा केल्या. इंग्लंडकडून जो रूटने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. तसेच रेहान अहमद आणि टॉम हार्टली यांनी 2 विकेट, तर जॅक लीचने 1 विकेट घेतली.
इंग्लंडकडून ऑली पोपचे शानदार शतक
त्यानंतर इंग्लंडच्या ऑली पोपने शानदार फलंदाजी करून भारतीय गोलंदाजांना चांगलेच थकवले. त्याने 208 चेंडूत 148 धावांची खेळी केली. त्याने या खेळीत 17 चौकार लगावले. यासोबतच भारतीय भूमीत कसोटीत शतक करणारा ऑली पोप हा इंग्लंडचा 14 वा खेळाडू ठरला आहे. पोपशिवाय इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला 50 धावांचा टप्पा गाठता आला नाही. यामध्ये सलामीवीर जॅक क्रॉली 31 धावा करून बाद झाला. त्यानंतर डकेटने 52 चेंडूत 47 धावा धावा केल्या. त्याने या खेळीत 7 चौकार ठोकले. तो चांगली फलंदाजी करतोय असे वाटत असतानाच त्याची विकेट पडली. त्यानंतर ऑली पोप आणि बेन फॉक्सने सहाव्या विकेटसाठी 112 धावांची खेळी करत इंग्लंडचा डाव सावरला. यामध्ये फॉक्सने संयमी खेळी करत 81 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने 34 धावा केल्या. त्यानंतर ऑली पोप आणि रेहान अहमद यांनी सातव्या विकेटसाठी नाबाद 41 धावांची भागीदारी रचली. त्यामुळे इंग्लंडला दिवसअखेर 6 बाद 316 धावांपर्यंत मजल मारता आली.