चेन्नई, 20 सप्टेंबर: (विश्वजीत खाटमोडे) भारत आणि बांगलादेश यांच्यातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना सध्या खेळविण्यात येत आहे. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्याचा आज (दि.20) दुसरा दिवस समाप्त झाला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेंव्हा भारताने दुसऱ्या डावात 3 बाद 81 धावा केल्या होत्या. तत्पूर्वी, या सामन्यात भारताने आपल्या पहिल्या डावात 376 धावा केल्या होत्या. तर प्रत्युत्तरात बांगलादेशचा पहिला डाव 149 धावांत संपुष्टात आला. यावेळी बांगलादेशचा संघ फॉलोऑन वाचवू शकला नाही. दरम्यान, आजच्या दिवशी एकूण 17 विकेट पडल्या आहेत. एमए चिदंबरम स्टेडियमवरील हा एक विक्रम आहे.
https://x.com/BCCI/status/1837094837843284397?s=19
बांगलादेश पहिल्या डावात 149 धावा
आजच्या दिवशी बांगलादेशचा संघाचा पहिल्या डाव 47.1 षटकात 149 धावांवर संपुष्टात आला. यामध्ये शाकिब अल हसनने सर्वाधिक 32 धावा केल्या. तर पहिल्या डावात भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 4 विकेट आणि मोहम्मद सिराज, आकाश दीप आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. दरम्यान, आजच्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने दुसऱ्या डावात 3 बाद 81 धावा केल्या होत्या. सध्या शुभमन गिल 33 आणि रिषभ पंत 12 धावांवर खेळत आहेत. दरम्यान, दुसऱ्या डावात देखील रोहित शर्मा आणि विराट कोहली पुन्हा एकदा स्वस्तात बाद झाले. यावेळी विराट कोहलीने 17 धावा आणि रोहित शर्माने केवळ 5 धावा केल्या. तसेच यशस्वी जैस्वाल 10 धावा करून बाद झाला. या सामन्यात भारतीय संघाकडे सध्या आघाडी 308 धावांची झाली आहे.
आर अश्विनची दमदार शतकी खेळी!
तत्पूर्वी, आजच्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेंव्हा भारतीय संघाने आपल्या पहिल्या डावातील धावसंख्येत आणखी 37 धावांची भर घातली. पहिल्या डावात भारताकडून रविचंद्रन अश्विनने सर्वाधिक 117 धावा केल्या आणि रवींद्र जडेजाने 86 धावांची खेळी केली. तसेच यशस्वी जैस्वालने ही 56 धावा केल्या. तर पहिल्या डावात बांगलादेशकडून हसन महमूदने सर्वाधिक 5 विकेट, तर तस्किन अहमदने 3 विकेट घेतल्या.