चेन्नई, 19 सप्टेंबर: (विश्वजीत खाटमोडे) भारत आणि बांगलादेश यांच्यातील 2 सामन्यांच्या कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला गुरुवारपासून (19 सप्टेंबर) सुरूवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना सध्या खेळविण्यात येत आहे. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर सकाळी 9.30 वाजल्यापासून सुरू होईल. दरम्यान, या सामन्याची नाणेफेक झाली आहे. यावेळी बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतीय संघ पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरणार आहे.
https://x.com/BCCI/status/1836610008504783015?s=19
रिषभ पंतचे कसोटीत पुनरागमन
मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरची ही पहिलीच कसोटी मालिका आहे. तसेच भारतीय संघ 6 महिन्यांनंतर कसोटी क्रिकेट मालिका खेळणार आहे. त्यामुळे भारतीय संघ या मालिकेत कशी कामगिरी करतो? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, या कसोटी मालिकेसाठी रोहित शर्मा भारतीय संघाचा कर्णधार असणार आहे. विराट कोहली, केएल राहुल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह यांसारखे अनुभवी खेळाडू आजचा सामना खेळणार आहेत. तर आजच्या सामन्यातून रिषभ पंत दीड वर्षाहून अधिक काळानंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. रिषभ पंतचा डिसेंबर 2022 मध्ये भीषण कार अपघात झाला होता. त्यामुळे त्याला बराच काळ क्रिकेटपासून राहावे लागले होते.
फिरकी गोलंदाजांना मदत?
दरम्यान, या मालिकेतील पहिला कसोटी सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळविण्यात येत आहे. या मैदानावर फिरकी गोलंदाजांना मदत मिळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे दोन्ही संघात प्रत्येकी दोन फिरकी गोलंदाजांना संधी देण्यात आली आहे. आजच्या सामन्यात भारताकडून रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजा हे फिरकी गोलंदाज खेळणार आहेत. तर बांगलादेशच्या संघात मेहदी हसन मिराज आणि शाकीब अल हसन यांच्यावर फिरकीची जबाबदारी असणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने तीन वेगवान गोलंदाजांना संघात सामील केले आहे. यामध्ये जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि आकाश दीप यांचा समावेश आहे.
भारतीय संघ:-
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.
बांगलादेश संघ:-
शादमान इस्लाम, झाकीर हसन, नझमुल हुसेन शांतो (कर्णधार), मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन, लिटन दास (यष्टीरक्षक), मेहदी हसन मिराज, तस्किन अहमद, हसन महमूद आणि नाहिद राणा.