मोहाली, 11 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला आजपासून सुरूवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या मोहाली येथील आयएस बिंद्रा स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहे. हा सामना सायंकाळी 7 वाजता सुरू होईल. दरम्यान, या टी-20 मालिकेतून रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी भारतीय संघात पुनरागमन केले आहे. तर विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोघेही 2022 च्या टी-20 विश्वचषकानंतर एकही टी-20 सामना खेळलेले नाहीत.
कोहलीची सामन्यातून माघार!
तत्पूर्वी, या सामन्याच्या आधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. मोहालीत आज खेळल्या जाणार्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली खेळणार नाही. याची माहिती भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी दिली आहे. दरम्यान, विराट कोहलीने कौटुंबिक कारणाने या सामन्यातून माघार घेतली असल्याचे म्हटले जात आहे. तर विराट हा 14 जानेवारी रोजी होणाऱ्या दुसऱ्या टी-20 सामन्याच्या आधी भारतीय संघात सामील होणार आहे. त्यामुळे विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाच्या डावाची सुरूवात कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल करण्याची शक्यता आहे.
कसे असणार मोहालीतील हवामान?
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात आज मोहालीमध्ये सामना खेळविण्यात येणार आहे. हा सामना सायंकाळी 7 नंतर सूरू होईल. मोहालीत सध्या मोठ्या प्रमाणात थंडीचे वातावरण आहे. तर याठिकाणी सायंकाळपासून तापमानात घट होण्यास सुरूवात होते. त्यामुळे आजच्या सामन्यात धूके पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सामन्यात धुक्यामुळे अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.
या चॅनलवर सामना पाहता येणार!
मोहोलीच्या खेळपट्टीवर सामन्याच्या सुरूवातीला वेगवान गोलंदाजांना मदत मिळण्याची शक्यता आहे. मात्र, काही वेळानंतर फलंदाजांना फलंदाजी करताना अडचण येत नाही. त्यामुळे या खेळपट्टीवर भरपूर धावा होतात. दरम्यान, या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स 18 आणि कलर्स सिनेप्लेक्स या चॅनलवर होणार आहे. त्याचवेळी हा सामना जियो सिनेमा या ॲपवर देखील ऑनलाईन पाहता येणार आहे.
भारतीय संघ:-
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, टिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, आवेश खान आणि मुकेश कुमार.
अफगाणिस्तान संघ:-
इब्राहिम झदरन (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज, इक्रम अलीखिल, हजरतुल्ला झाझाई, रहमत शाह, नजीबुल्ला झदरन, मोहम्मद काबी, करीम जन्नत, अजमतुल्ला उमरझाई, शराफुद्दीन अश्रफ, मुजीबुर रहमान, फजलहक फारुकी, फरीद अहमद, नवीनुल हक, नूर अहमद, कैस अहमद, गुलबदन नायब आणि रशीद खान.