भारत विरुद्ध अफगाणिस्तान आज दुसरा टी-20 सामना; विराट कोहली खेळणार!

इंदोर, 14 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात आज टी-20 मालिकेतील दुसरा सामना खेळविण्यात येणार आहे. हा सामना इंदोर मधील होळकर स्टेडियमवर सायंकाळी 7 वाजता सुरू होणार आहे. गेल्या सामन्यात भारतीय संघाने अफगाणिस्तानचा पराभव केला होता. त्यामुळे आजचा सामना जिंकून 3 सामन्यांची ही टी-20 मालिका जिंकण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असणार आहे. या सामन्यात विराट कोहली 14 महिन्यांनंतर टी-20 मध्ये पुनरागमन करणार आहे. तत्पूर्वी, अफगाणिस्तान विरुद्धच्या या टी-20 मालिकेसाठी विराट कोहलीची निवड झाली होती. मात्र, विराट कोहली कौटुंबिक कारणामुळे पहिल्या सामन्यात खेळला नव्हता.

रोहित शर्माच्या कामगिरीकडे लक्ष!

तसेच कर्णधार रोहित शर्मा देखील 2022 च्या टी-20 विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळत आहे. रोहित शर्मा पहिल्या सामन्यात शून्य धावांवर धावबाद झाला होता. त्यामुळे त्याच्यावर देखील या सामन्यात धावा करण्याचा दबाव असणार आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये भारताचा सलामीवीर शुभमन गिल याने निराशाजनक कामगिरी केली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात यशस्वी जैस्वाल तंदुरूस्त झाला, तर त्याची आज संघात निवड होण्याची शक्यता आहे.

विराटचे आज टी-20 मध्ये पुनरागमन!

याशिवाय, विराट कोहली आजच्या टी-20 सामन्यात खेळताना दिसणार आहे. कोहली 14 महिन्यांनंतर टी-20 मध्ये पुनरागमन करणार आहे. त्यामुळे विराट कोहलीला कोणाच्या जागी संघात संधी मिळते? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर विराट कोहलीच्या संघातील समावेशामुळे तिलक वर्माला संघातून वगळण्याची दाट शक्यता आहे. सोबतच संजू सॅमसन की जितेश शर्मा यांपैकी कोणता यष्टिरक्षक संघात खेळणार? याचा रोहित शर्माला निर्णय घ्यावा लागणार आहे.

आज धावांचा पाऊस पडणार?

इंदोरच्या होळकर स्टेडियमवर आजचा सामना होणार आहे. या मैदानाची खेळपट्टी फलंदाजांसाठी अधिक उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे. कारण यापूर्वी झालेल्या बहुतांश सामन्यात याठिकाणी धावांचा पाऊस पडलेला आहे. तसेच या मैदानाची सीमारेषा देखील छोटी आहे. त्यामुळे या मैदानावर फलंदाजांना चांगल्या धावा करता येतात. म्हणून आजच्या सामन्यात मोठी धावसंख्या होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आगामी टी-20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघाची ही शेवटची आंतरराष्ट्रीय टी-20 मालिका आहे. त्यामुळे या मालिकेत चांगली कामगिरी करण्याचे दडपण भारताच्या खेळाडूंवर असणार आहे.

भारतीय संघ:-

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, टिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, आवेश खान आणि मुकेश कुमार.

अफगाणिस्तान संघ:-

इब्राहिम झदरन (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज, इक्रम अलीखिल, हजरतुल्ला झाझाई, रहमत शाह, नजीबुल्ला झदरन, मोहम्मद काबी, करीम जन्नत, अजमतुल्ला उमरझाई, शराफुद्दीन अश्रफ, मुजीबुर रहमान, फजलहक फारुकी, फरीद अहमद, नवीनुल हक, नूर अहमद, कैस अहमद, गुलबदन नायब आणि रशीद खान.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *