दिल्ली, 13 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) भारतीय क्रिकेट संघ आता इंग्लंडविरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये युवा यष्टीरक्षक ध्रुव जुरेल याची 16 सदस्यीय भारतीय संघात निवड झाली आहे. तर भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हा अद्याप दुखापतीमधून सावरलेला नाही. तसेच यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशनने काही काळ क्रिकेट पासून ब्रेक घेतला आहे. त्यामुळे या दोघांची इंग्लंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघात निवड करण्यात आलेली नाही.
बुमराह आणि सिराजचे पुनरागमन!
याशिवाय इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज या वेगवान गोलंदाजांनी भारतीय संघात पुनरागमन केले आहे. या दोघांना अफगाणिस्तान विरुद्धच्या टी-20 मालिकेत विश्रांती देण्यात आली होती. तर दुसरीकडे अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर आणि वेगवान गोलंदाज प्रसीध कृष्णा यांना इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून डच्चू देण्यात आला आहे. यापूर्वी ह्या दोघांची दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या कसोटी मालिकेत निवड झाली होती. मात्र त्यांना या मालिकेत फारशी चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यांच्याजागी इंग्लंडविरुद्धच्या भारतीय संघात आता अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल आणि वेगवान गोलंदाज आवेश खान यांची निवड झाली आहे.
25 जानेवारी ते 11 मार्च दरम्यान मालिका
दरम्यान, भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडविरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. ही मालिका मायदेशातच होणार आहे. 25 जानेवारी पासून या कसोटी मालिकेला सुरूवात होणार आहे. यातील पहिला सामना 25 जानेवारी रोजी हैदराबाद येथे खेळविण्यात येणार आहे. तर दुसरा कसोटी सामना 2 फेब्रुवारी रोजी विशाखापट्टणम येथे, तिसरा सामना 15 फेब्रुवारी रोजी राजकोट येथे, चौथा सामना 23 फेब्रुवारी रोजी रांची येथे आणि पाचवा कसोटी सामना 7 मार्च रोजी धरमशाळा येथे खेळविण्यात येणार आहे.
पहिल्या दोन कसोटीसाठी निवडण्यात आलेला भारतीय संघ:-
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार) आणि आवेश खान.