डर्बन, 10 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला आजपासून सुरूवात होणार आहे. ही मालिका आफ्रिकेच्या खेळपट्ट्यांवर खेळवण्यात येणार आहे. या टी-20 मालिकेसाठी सूर्यकुमार यादवकडे भारताचे कर्णधारपद सोपविण्यात आले आहे. तत्पूर्वी वनडे विश्वचषकानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर झालेल्या टी-20 मालिकेत भारतीय संघाने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात खेळताना 4-1 असा विजय मिळवला होता. त्यामुळे सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली सलग दुसऱ्या टी-20 मालिकेत विजय मिळवण्याच्या इराद्याने भारतीय संघ आज मैदानावर उतरणार आहे.
https://twitter.com/BCCI/status/1733531955709489309?s=19
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी-20 सामना आज दक्षिण आफ्रिकेच्या डर्बन येथील किंग्समीड स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहे. हा सामना सायंकाळी 7:30 वाजता सुरू होईल. दरम्यान, दक्षिण आफ्रिका दौऱ्यात उसळत्या खेळपट्ट्यांवर युवा भारतीय संघाची चांगलीच कसोटी लागणार आहे.
दक्षिण आफ्रिकेने त्यांचा प्रमुख वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा याला विश्रांती दिली आहे. तर त्यांचे ॲनरिक नोर्टजे आणि लुंगी एनगिडी हे वेगवान गोलंदाज दुखापतग्रस्त असल्याने या मालिकेत खेळणार नाहीत. तरीदेखील या मालिकेत भारतीय फलंदाजांसमोर आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांचे तगडे आव्हान असणार आहे. तसेच आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्कराम याच्यासह हेनरिक क्लासेन आणि डेव्हिड मिलर यांसारखे फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर डोकेदुखी ठरू शकतात.
तत्पूर्वी, या टी-20 मालिकेत भारताचा सलामीवीर शुभमन गिल याने पुनरागमन केले आहे. आजच्या सामन्यात तो भारताच्या डावाची सुरूवात करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सामन्यात ऋतुराज गायकवाड किंवा यशस्वी जैस्वाल या दोघांपैकी एकाला विश्रांती देण्यात येऊ शकते. तर ईशान किशन आणि जितेश शर्मा हे दोन विकेटकिपर या भारतीय संघात आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात कोणाला संधी मिळणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
तसेच दूसरीकडे भारतीय संघाची गोलंदाजी देखील मजबूत आहे. या मालिकेत दीपक चहर, अर्शदीप सिंग आणि मुकेश कुमार हे तीन वेगवान आहेत. तर रवींद्र जडेजा कुलदीप यादव, रवी बिश्नोई आणि वॉशिंग्टन सुंदर हे फिरकी गोलंदाज या भारतीय संघात आहेत. त्यामुळे या मालिकेत भारतीय गोलंदाज चांगली गोलंदाजी करतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेचे स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. त्यामुळे स्टार स्पोर्ट्सच्या चॅनलवरून तुम्ही हा सामना पाहू शकता. तसेच डीडी फ्री डिश वरील डीडी स्पोर्ट्स या चॅनलवर या मालिकेतील सामने पाहता येणार आहेत. याशिवाय, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिका तुम्हाला हॉटस्टार या मोबाईल ॲपवर मोफत पाहता येणार आहे.