बेंगळुरू, 17 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ समाप्त झाला आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेंव्हा न्यूझीलंडच्या संघाची धावसंख्या 3 बाद 134 इतकी झाली आहे. त्यामुळे न्यूझीलंडकडे सध्या 134 धावांची आघाडी आहे. दिवसाचा खेळ संपला त्यावेळी न्यूझीलंडचे रचिन रवींद्र 22 आणि डॅरिल मिशेल 14 धावांवर खेळत होते. या सामन्यात भारतीय संघाचा पहिला डाव केवळ 46 धावांत संपुष्टात आला. भारतातील कसोटी क्रिकेट मधील ही सर्वात नीचांकी धावसंख्या आहे. दरम्यान, या कसोटी सामन्याचा पहिला दिवस पावसामुळे रद्द झाला आहे.
https://x.com/BCCI/status/1846884807403622549?t=v4l2a9l9_fYRqBlzpx5_rA&s=19
तत्पूर्वी, बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळविण्यात येत असलेल्या या सामन्यात आज (दि.17) भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु कर्णधार रोहित शर्माचा हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला. सामना सुरू झाल्यानंतर भारताचे पाहिले तीन फलंदाज संघाची 10 धावसंख्या असताना बाद झाले. यामध्ये कर्णधार रोहित शर्मा (2), विराट कोहली (0) आणि सरफराज खान (0) यांचा समावेश होता. त्यानंतर यशस्वी जैस्वाल आणि रिषभ पंत यांनी न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांसमोर प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. परंतु, यशस्वी जैस्वाल (13) आणि रिषभ पंत (20) हे ठराविक अंतराने बाद झाले. त्यानंतर इतर कोणत्याही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या देखील गाठता आली नाही. त्यामुळे भारतीय संघाचा पहिला डाव 46 धावांत संपुष्टात आला. न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. तर विल्यम ओरूर्कने 4 आणि टीम साऊदीने एक विकेट घेतली.
त्यानंतर प्रत्युत्तरात खेळताना न्यूझीलंडची सुरूवात चांगली झाली. तेंव्हा कर्णधार टॉम लॅथम आणि डेव्हॉन कॉनवे यांनी पहिल्या विकेटसाठी 67 धावांची भागीदारी केली. त्यावेळी टॉम लॅथम 15 धावा करून बाद झाला. त्यानंतर विल यंग आणि डेव्हॉन कॉनवे यांनी दुसऱ्या विकेटसाठी 75 भागीदारी केली. त्यावेळी रवींद्र जडेजाने शानदार फलंदाजी करणाऱ्या विल यंगला 33 धावांवर बाद केले. त्यानंतर डेव्हॉन कॉनवे रविचंद्रन अश्विनच्या गोलंदाजीवर बाद झाला. या सामन्यात कॉनवेचे शतक हुकले. त्याने 105 चेंडूत 91 धावांची खेळी केली. तर सध्या रचिन रवींद्र 22 आणि डॅरिल मिशेल 14 धावांवर खेळत आहेत. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेंव्हा न्यूझीलंडची धावसंख्या 3 बाद 180 झाली आहे. सध्या त्यांच्याकडे 134 धावांची आघाडी आहे. भारताकडून रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली आहे. त्यामुळे आता भारतीय गोलंदाजांच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे.