पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा एक डाव आणि 32 धावांनी पराभव

सेंच्युरियन, 28 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) सेंच्युरियनमध्ये खेळविण्यात आलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा एक डाव आणि 32 धावांनी पराभव केला आहे. या सामन्याच्या पहिल्या डावात भारताने 245 धावा केल्या होत्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने त्यांच्या पहिल्या डावात 408 धावा केल्या होत्या. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेकडे पहिल्या डावात 163 धावांची आघाडी होती. तर या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी आज भारतीय संघाचा दुसरा डाव 131 धावांत संपुष्टात आला. त्यामुळे या सामन्यात भारताचा एक डाव आणि 32 धावांनी पराभव झाला. या विजयामुळे 2 सामन्यांच्या या मालिकेत आफ्रिकेने 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

https://twitter.com/ICC/status/1740388641912828037?s=19



भारताच्या दुसऱ्या डावात विराट कोहलीने सर्वाधिक 76 धावांची खेळी केली. तर संघातील अन्य खेळाडूंनी दुसऱ्या डावात निराशाजनक कामगिरी केली. दुसऱ्या डावात भारताचे 9 फलंदाज दुहेरी धावसंख्या देखील गाठू शकले नाहीत. या डावात दक्षिण आफ्रिकेकडून नांद्रे बर्गरने 4, मार्को जॅनसेनने 3 आणि कागिसो रबाडाने 2 विकेट घेतल्या. तत्पूर्वी, आजच्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने 5 बाद 256 या धावसंख्येपासून पुढे खेळण्यास सुरूवात केली. यावेळी दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 408 धावांवर संपुष्टात आला.

https://twitter.com/ICC/status/1740379796331274535?s=19

दक्षिण आफ्रिकेकडून डीन एल्गरने पहिल्या डावात सर्वाधिक 185 धावा केल्या. त्याने या खेळीत 28 चौकार लगावले. त्याच्या या खेळीमुळे त्याला या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला आहे. त्यासोबतच पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेचा मार्को जेंन्सन 84 धावांवर नाबाद राहिला. तर पहिल्या डावात गोलंदाजीत भारताकडून जसप्रीत बुमराह 4 आणि मोहम्मद सिराज यांनी 2 विकेट घेतल्या. तसेच शार्दुल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा आणि रविचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *