राजकोट, 17 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) भारत आणि इंग्लंड यांच्यात राजकोटमध्ये पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना खेळला जात आहे. या सामन्याचा तिसऱ्या दिवसाचा खेळ आज समाप्त झाला. यावेळी तिसऱ्या दिवसाअखेर भारतीय संघाने दुसऱ्या डावात 2 बाद 196 धावा केल्या आहेत. या सामन्यात भारताकडे सध्या 322 धावांची आघाडी आहे. त्यामुळे या सामन्यात भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे. या सामन्याच्या आजच्या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव 319 धावांत संपुष्टात आला. त्यावेळी भारताच्या मोहम्मद सिराजने इंग्लंडचे 4 गडी बाद केले.
https://twitter.com/BCCI/status/1758816919136972855?s=19
इंग्लंड पहिल्या डावात 319 धावा
तत्पूर्वी, या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी भारताने त्यांच्या पहिल्या डावात 445 धावा केल्या. त्यानंतर इंग्लंड संघाला पहिल्या डावात 319 धावा करता आल्या. यावेळी त्यांच्या बेन डकेटने सर्वाधिक 153 धावांची खेळी केली. तर कर्णधार बेन स्टोक्स याने 41 धावा केल्या. पहिल्या डावात भारताकडून मोहम्मद सिराज 4, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 2, तर जसप्रीत बुमराह आणि रविचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
यशस्वी जैस्वाल रिटायर हर्ट!
दुसऱ्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाची खराब सुरूवात झाली. भारताचा कर्णधार रोहित शर्मा संघाची 30 धावसंख्या असताना बाद झाला. रोहितने दुसऱ्या डावात 19 धावा केल्या. त्यानंतर यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल यांनी भारताचा डाव सावरला. यावेळी यशस्वी जैस्वालने शानदार शतक झळकावले. यशस्वी जैस्वाल याने 133 चेंडूत 104 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने 9 चौकार आणि 5 षटकार लगावले. मात्र, त्यावेळी पाठदुखीच्या समस्येमुळे जैस्वाल मैदानाबाहेर गेला. त्यानंतर खेळण्यासाठी आलेल्या रजत पाटीदार याला दुसऱ्या डावात फारसे काही करता आले नाही. यावेळी त्याला खाते देखील उघडता आले नाही. तिसऱ्या दिवसाअखेर सध्या भारतीय संघाच्या दुसऱ्या डावात 2 बाद 196 धावा झाल्या आहेत. यावेळी भारताचे शुभमन गिल 65 आणि कुलदीप यादव 3 धावांवर नाबाद खेळत आहेत. तर इंग्लंडकडून ज्यो रूट आणि टॉम हार्टली यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.