कोलकाता, 20 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेला आजपासून (22 जानेवारी) सुरूवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानावर सायंकाळी 7 वाजता खेळवला जाईल. या मालिकेत सूर्यकुमार यादव भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. तर दुसरीकडे, इंग्लंडच्या कर्णधारपदाची धुरा जोस बटलरच्या खांद्यावर असेल. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आधी ही मालिका असल्याने दोन्ही संघातील काही खेळाडूंच्या कामगिरीकडे विशेष लक्ष असणार आहे.
https://x.com/StarSportsIndia/status/1881695748565459163?t=bbR1MgdLpqF3wmMqOo0BKQ&s=19
मोहम्मद शमीचे पुनरागमन
भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका गमावल्यानंतर टी-20 मालिकेसाठी सज्ज झाला आहे. इंग्लंड विरुद्धच्या या मालिकेद्वारे भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी 14 महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. त्याने 19 नोव्हेंबर 2023 रोजी शेवटचा सामना खेळला होता, जो आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना होता. घोट्याच्या दुखापतीनंतर शमीवर शस्त्रक्रिया करण्यात आली, यानंतर तो आता पुन्हा खेळण्यासाठी फिट झाला आहे.
भारतीय संघाची तयारी
या मालिकेनंतर भारत आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार असल्याने इंग्लंडविरुद्ध ही मालिका काही भारतीय खेळाडूंसाठी महत्त्वपूर्ण आहे. यामध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवड झालेल्या हार्दिक पांड्या, मोहम्मद शमी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, आणि अर्शदीप सिंग यांच्या कामगिरीकडे विशेष लक्ष असेल. दरम्यान, या टी-20 मालिकेसाठी सूर्यकुमार यादव भारतीय संघाचा कर्णधार असून अक्षर पटेल उपकर्णधार आहे. भारतीय संघात संजू सॅमसन, तिलक वर्मा, रिंकू सिंग यांसारखे अनुभवी फलंदाज तसेच हार्दिक पांड्या, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांसारखे अष्टपैलू खेळाडू आहेत. तर वेगवान गोलंदाजीची धुरा मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, हर्षित राणा यांच्यावर असेल.
इंग्लंड संघाचा आढावा
इंग्लंड संघातही जोस बटलर, फिल सॉल्ट, लियाम लिव्हिंगस्टोन, हॅरी ब्रूक यांसारखे धडाकेबाज खेळाडू आहेत. संघातील जोफ्रा आर्चर, मार्क वुड आणि आदिल रशीद यांसारखे अनुभवी गोलंदाज भारतीय फलंदाजांसमोर आव्हान निर्माण करू शकतात.
टी-20 मालिकेचे वेळापत्रक
इंग्लंड विरुद्धच्या या 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 22 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजता कोलकाता येथे खेळविला जाईल. दुसरा सामना 25 जानेवारी रोजी चेन्नई, तिसरा सामना 28 जानेवारी जानेवारी रोजी राजकोट, चौथा सामना 31 जानेवारी रोजी पुणे, पाचवा आणि शेवटचा सामना 2 फेब्रुवारी रोजी मुंबईत खेळविण्यात येणार आहे. हे सर्व सामने देखील सायंकाळी 7 वाजता सुरू होणार आहेत.
या मालिकेचे थेट प्रक्षेपण कोठे?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि लाईव्ह स्ट्रीमिंग डिस्ने + हॉटस्टार ॲपवर होईल. त्याचबरोबर फ्री डिश दर्शकांना भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामने डीडी स्पोर्ट्सवर विनामूल्य पाहता येतील.
भारतीय संघ:
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अक्षर पटेल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, तिलक वर्मा, रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, वरूण चक्रवर्ती.
इंग्लंड संघ:
जोस बटलर (कर्णधार), बेन डकेट, फिल सॉल्ट, हॅरी ब्रूक, जेकब बेथॉल, लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी ओव्हरटन, गस ऍटकिन्सन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वुड.