जोहान्सबर्ग, 17 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 8 गडी राखून पराभव केला आहे. या विजयामुळे भारतीय संघाने 3 सामन्यांच्या या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. तत्पूर्वी या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकेचा डाव केवळ 116 धावांत संपुष्टात आला. त्यानंतर भारताने त्यांचे 117 धावांचे आव्हान 16.4 षटकात पुर्ण केले. या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला आहे. त्याने या सामन्यात 10 षटकांत 37 धावा देत 5 विकेट घेतल्या.
https://twitter.com/ICC/status/1736359826353987633?s=19
जोहान्सबर्ग येथील मैदानावर खेळविण्यात आलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यावेळी भारताच्या अर्शदीप सिंग आणि आवेश खान या वेगवान गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी केली. या दोघांनी मिळून नऊ विकेट घेतल्या. त्यांच्या भेदक गोलंदाजी पुढे आफ्रिकेच्या फलंदाजांचा टिकाव लागला नाही. यावेळी आफ्रिकेच्या 7 फलंदाजांना दुहेरी धावसंख्या देखील करता आली नाही. दक्षिण आफ्रिकेतर्फे अँडिले फेहलुकवायो याने सर्वाधिक 33 धावांची खेळी केली. तसेच टोनी डी जॉर्ज याने 28 धावा केल्या. तर त्यांच्या उर्वरित फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे आफ्रिकेचा संघ 27.3 षटकांत 116 धावांत बाद झाला. भारताकडून अर्शदीप सिंगने 5, आवेश खान 4 आणि कुलदीप यादवने 1 विकेट घेतली.
https://twitter.com/BCCI/status/1736364610960400888?s=19
प्रत्युत्तरात या धावसंख्येचा पाठलाग करत असताना भारताचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड हा 5 धावा करून बाद झाला. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि भारताकडून पदार्पण करणाऱ्या साई सुदर्शन या दोघांनी अर्धशतके झळकावून भारतीय संघाला विजय मिळवून दिला. यावेळी साई सुदर्शनने 43 चेंडूत नाबाद 55 धावा केल्या. तर श्रेयस अय्यरने 45 चेंडूत 52 धावांची खेळी केली. आफ्रिकेकडून विआन मुल्डर आणि अँडिले फेहलुकवायो यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. या विजयासह भारताने 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील दुसरा सामना 19 डिसेंबर रोजी खेळविण्यात येणार आहे. त्यामुळे दुसरा सामना जिंकून ही मालिका जिंकण्याचा प्रयत्न भारतीय संघ करणार आहे.