कोलकाता, 5 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) आयसीसी क्रिकेट विश्वचषकातील सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 243 धावांनी पराभव केला आहे. या स्पर्धेतील भारताचा हा सलग आठवा विजय आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 326 धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा डाव केवळ 83 धावांतच संपुष्टात आला. विशेष म्हणजे, भारतीय संघ या विश्वचषकात आतपर्यंत अपराजित राहिला आहे.
https://twitter.com/cricketworldcup/status/1721182272898883654?s=19
बीड हिंसाचाराची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी – धनंजय मुंडे
तत्पूर्वी या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 5 गडी गमावून 326 धावा केल्या होत्या. यामध्ये भारतातर्फे विराट कोहलीने सर्वाधिक नाबाद 101 धावा केल्या. या कामगिरीमुळे विराटला या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच चा पुरस्कार देण्यात आला आहे. या सामन्यात विराटने 49 वे शतक करीत सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी केली. विराट कोहलीनंतर श्रेयस अय्यरने देखील शानदार फलंदाजी केली. श्रेयस अय्यरने 77 धावा केल्या. यासोबतच रोहित शर्मा (40), रविंद्र जडेजा (29) आणि सूर्यकुमार यादव (22) यांनी जलदगतीने धावा केल्या. तर आफ्रिकेकडून लुंगी एनगिडी, मार्को जॅनसेन, कागिसो रबाडा, केशव महाराज आणि तबरेझ शम्सी या गोलंदाजांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
कोहलीची सचिनच्या विक्रमाची बरोबरी; 49वे शतक पूर्ण!
त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेचा संघ 27.1 षटकांत केवळ 83 धावाच करू शकला. तर डावाच्या दुसऱ्याच षटकात दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का बसला. त्यांचा जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला क्विंटन डी कॉक 6 धावांवर बाद झाला. त्याला मोहम्मद सिराजने त्रिफळाचित बाद केले. या धक्क्यातून दक्षिण आफ्रिका सामन्याच्या शेवटपर्यंत सावरला नाही. यामध्ये आफ्रिकेकडून मार्को जेन्सनने सर्वाधिक 14 धावा केल्या. तर रॅसी व्हॅन डर डुसेन याने 13, कर्णधार टेंबा बावुमा 11 आणि डेव्हिड मिलर याने 11 धावा केल्या. तर अन्य फलंदाजांना दुहेरी धावसंख्या देखील करता आली नाही. आफ्रिकेचे 7 फलंदाज एकेरी धावसंख्या करून बाद झाले. भारताकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. तर मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 2, मोहम्मद सिराजने 1 विकेट घेतली. दरम्यान या विजयामुळे भारतीय संघाचे मनोधैर्य नक्कीच वाढणार आहे.
2 Comments on “भारताचा दक्षिण आफ्रिकेवर 243 धावांनी विजय”