धर्मशाळा, 09 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) धर्मशाळा येथील पाचव्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडचा एक डाव आणि 64 धावांनी पराभव केला आहे. त्यामुळे भारतीय संघाने 5 सामन्यांची ही कसोटी मालिका 4-1 ने जिंकली आहे. या सामन्याच्या पहिल्या डावात इंग्लंडने 218 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात खेळताना भारताने त्यांच्या पहिल्या डावात 477 धावा करून 259 धावांची आघाडी घेतली होती. त्यानंतर इंग्लंडचा दुसरा डाव 195 धावांत संपुष्टात आला. त्यामुळे हा सामना केवळ तीनच दिवसांत समाप्त झाला.
https://twitter.com/BCCI/status/1766384983021883568?s=19
https://twitter.com/BCCI/status/1766391051873558885?s=19
यशस्वी जैस्वाल ठरला मालिकावीर!
या सामन्यात शंभरावी कसोटी खेळणाऱ्या रविचंद्रन अश्विनने चमकदार कामगिरी केली. त्याने इंग्लंडच्या पहिल्या डावात 4 आणि दुसऱ्या डावात 5 विकेट घेतल्या. तर यावेळी कुलदीप यादवला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. त्याने या सामन्यात एकूण 7 विकेट घेतल्या. सोबतच या मालिकेत धावांचा पाऊस पडणाऱ्या यशस्वी जैस्वाल याला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला आहे. या मालिकेत यशस्वी जैस्वालने 2 द्विशतकांसह 712 धावा केल्या आहेत.
रविचंद्रन आश्विनची चमकदार कामगिरी
तत्पूर्वी, या सामन्यात भारताकडून पहिल्या डावात यशस्वी जैस्वालने 57, कर्णधार रोहित शर्मा 103, शुभमन गिल 110, देवदत्त पडीक्कल 65 आणि सरफराज खानने 56 धावांची खेळी केली. त्यामुळे भारताला पहिल्या डावात 477 धावा करता आल्या. तसेच यावेळी भारतीय संघाला 259 धावांची आघाडी मिळाली. मात्र प्रत्युत्तरात खेळताना इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात 195 धावाच करू शकला. इंग्लंडच्या फलंदाजांचा भारताच्या गोलंदाजीसमोर निभाव लागला नाही. दुसऱ्या डावात भारताकडून रविचंदन अश्विनने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. त्याचवेळी जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 2, तर रविंद्र जडेजाने 1 विकेट घेतली. दुसऱ्या डावात इंग्लंडकडून ज्यो रूटने सर्वाधिक 84 धावा केल्या.