राजकोट, 18 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) राजकोट येथील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडचा 434 धावांनी पराभव केला आहे. त्यामुळे तिसरा सामना जिंकून भारताने 5 सामन्यांच्या या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारताने इंग्लंडला 557 धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 122 धावांत बाद झाला. दुसऱ्या डावात भारताकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. रवींद्र जडेजाला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला आहे.
https://twitter.com/BCCI/status/1759181302354571282?s=19
भारताचा दुसरा डाव 430 धावांवर घोषित
तत्पूर्वी, भारताचा कर्णधार रोहित शर्माने संघाचा दुसरा डाव 4 बाद 430 धावसंख्या असताना घोषित केला. यावेळी यशस्वी जैस्वाल 214 आणि सर्फराज खान 68 धावा करून नाबाद राहिले. यशस्वी जैस्वालचे या मालिकेतील सलग दुसरे द्विशतक आहे. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी नाबाद 172 धावांची भागीदारी केली. त्याच्या आधी शुभमन गिल 91 धावांवर खेळत असताना धावबाद झाला. तर कुलदीप यादवने 27 धावा केल्या. दुसऱ्या डावात इंग्लंडकडून जो रूट, टॉम हार्टले आणि रेहान अहमद यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
रवींद्र जडेजाने घेतल्या 5 विकेट
त्यानंतर प्रत्युत्तरात खेळण्यासाठी आलेल्या इंग्लंड संघाचा दुसरा डाव 122 धावांत संपुष्टात आला. यामध्ये इंग्लंडच्या मार्क वूडने सर्वाधिक 33 धावांची खेळी केली. दुसऱ्या डावात इंग्लंडच्या फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. यावेळी इंग्लंडच्या 6 फलंदाजांना दुहेरी धावसंख्या देखील गाठता आली नाही. या सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. तर कुलदीप यादवने 2, अश्विन आणि बुमराहने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
पाहा पहिल्या डावात काय झाले?
तत्पूर्वी, या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात 445 धावा केल्या होत्या. यामध्ये कर्णधार रोहित शर्माने 131 धावा तर रवींद्र जडेजाने 112 धावांची खेळी केली होती. याशिवाय सर्फराज खानने 62 आणि ध्रुव जुरेलने 46 धावा केल्या होत्या. त्यानंतर इंग्लंडचा पहिला डाव 319 धावांत संपुष्टात आला. यावेळी मोहम्मद सिराजने इंग्लंडच्या 4 विकेट घेतल्या होत्या. तर पहिल्या डावात इंग्लंडकडून बेन डकेटने सर्वाधिक 153 धावा केल्या होत्या.
यशस्वी जैस्वालचे शानदार द्विशतक!
दरम्यान, यशस्वी जैस्वाल सध्या त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. यशस्वी जैस्वालने तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात द्विशतक झळकावून इतिहास रचला आहे. जैस्वालने 231 चेंडूत आपले द्विशतक पूर्ण केले. या खेळीत त्याने 14 चौकार आणि 12 षटकार लगावले. 22 वर्षीय यशस्वी जैस्वालचे हे या मालिकेतील सलग दुसरे द्विशतक आहे.