पहिल्या कसोटीत भारताचा बांगलादेशवर 280 धावांनी विजय

चेन्नई, 22 सप्टेंबर: (विश्वजीत खाटमोडे) पहिल्या कसोटी सामन्यात भारताने बांगलादेशचा 280 धावांनी दारूण पराभव केला आहे. त्यामुळे दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने बांगलादेशसमोर विजयासाठी 515 धावांचे लक्ष्य ठेवले होते. परंतु प्रत्युत्तरात बांगलादेशचा डाव 234 धावांवर संपुष्टात आला. दुसरा डावात भारताकडून रविचंद्रन अश्विन याने सर्वाधिक 6 विकेट, तर रवींद्र जडेजाने 3 विकेट घेतल्या. रविचंद्रन अश्विन या सामन्याचा मानकरी ठरला. त्याने या सामन्यात पहिल्या डावात 113 धावांची शानदार शतकी खेळी केली. तर अश्विनने गोलंदाजीत दुसऱ्या डावात 6 विकेट घेतल्या.

https://x.com/BCCI/status/1837733267627515972?s=19

पहिल्या डावात 227 धावांची आघाडी

तत्पूर्वी, या सामन्यात बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. त्यावेळी प्रथम फलंदाजी करताना भारताने आपल्या पहिल्या डावात 376 धावा केल्या. यामध्ये पहिल्या डावात भारताकडून रविचंद्रन अश्विन याने सर्वाधिक 113 धावांची खेळी केली. तसेच यावेळी रवींद्र जडेजाने देखील 86 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा पहिला डाव 149 धावांवर समाप्त झाला. यावेळी भारताकडून जसप्रीत बुमराह याने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. त्यामुळे पहिल्या डावात भारताला 227 धावांची मोठी आघाडी मिळाली.

दुसऱ्या डावात अश्विनचे 6 बळी

त्यानंतरही भारतीय संघाने बांगलादेशला फॉलोऑन दिला नाही. भारताने दुसऱ्या डावात फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी भारताने आपला दुसरा डाव 4 गडी बाद 287 धावांवर घोषित केला. दुसऱ्या डावात शुभमन गिल आणि रिषभ पंत यांच्या शतकांच्या जोरावर भारताने बांगलादेशला विजयासाठी 515 धावांचे बलाढ्य असे लक्ष्य दिले. या डावात शुभमनने नाबाद 119 आणि पंतने 109 धावांची शानदार खेळी केली. या दोघांनी यावेळी चौथ्या विकेटसाठी 167 धावांची भागीदारी केली. त्यानंतर 515 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या बांगलादेश संघाचा दुसरा डाव 234 धावांवर संपुष्टात आला. यावेळी बांगलादेशकडून नजमुल हुसेन शांतोने सर्वाधिक 82 धावा केल्या. तर भारताकडून रविचंद्रन अश्विनने सर्वाधिक 6 विकेट, रवींद्र जडेजा 3 विकेट आणि जसप्रीत बुमराह याने एक विकेट घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *