पाचव्या टी-20 सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय

बंगळुरू, 03 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटचा सामना आज खेळविण्यात आला. हा सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला गेला. रोमांचक अशा या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर 6 धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियासमोर 161 धावांचे लक्ष्य ठेवले होते. तर प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 20 षटकांत 8 बाद 154 धावा केल्या. याबरोबरच भारताने 5 सामन्यांची ही मालिका 4-1 ने जिंकली आहे.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मॅथ्यू वेडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रथम फलंदाजी करीत असलेल्या भारतीय संघाने यावेळी 20 षटकांत 8 बाद 160 धावा केल्या. यामध्ये भारतातर्फे संघाकडून श्रेयस अय्यरने 37 चेंडूत सर्वाधिक 53 धावा केल्या. त्याने त्याच्या या खेळीत 5 चौकार आणि 2 षटकार लगावले. त्यानंतर अक्षर पटेलने 21 चेंडूत 31 धावा करून त्याला चांगली साथ दिली. त्यामुळे भारताला 160 धावांपर्यंत मजल मारता आली.

तत्पूर्वी भारतीय संघाच्या डावाची सुरूवात खराब झाली होती. भारताचे 4 फलंदाज 55 धावांतच बाद झाले. यामध्ये यशस्वी जैस्वाल 21, ऋतुराज गायकवाड 10, सूर्यकुमार यादव 5 आणि रिंकू सिंग 6 धावांवर बाद झाला. त्यानंतर जितेश शर्माने 16 चेंडूत 24 धावांची खेळी केली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून जेसन बेहरेनडॉर्फ आणि बेन डोर्सिस यांनी प्रत्येकी 2, तर ॲरॉन हार्डी, नॅथन एलिस आणि तन्वीर संघाला प्रत्येकी एक विकेट मिळाली.

आत्मनिर्भर भारत संकल्पनेचा आज विजय झाला – नरेंद्र मोदी

त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाची देखील खराब सुरूवात झाली. त्यांचेही 3 फलंदाज 55 धावांत बाद झाले. यावेळी जोश फिलिप 4, ट्रॅव्हिस हेड 28 आणि ॲरॉन हार्डी 6 धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या टीम डेव्हिड आणि बेन मॅकडरमॉट यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. यावेळी टीम डेव्हिड 17 धावा करून बाद झाला. त्यानंतर बेन मॅकडरमॉट देखील लगेचच बाद झाला. त्याने 36 चेंडूत 54 धावांची खेळी केली. त्याने या खेळीत 5 चौकार लगावले. त्यानंतर मुकेश कुमारने 17 व्या षटकात सलग 2 विकेट घेतल्या. त्याने तिसऱ्या चेंडूवर मॅथ्यू शॉर्टला 16 धावांवर बाद केले आणि पुढच्या चेंडूवर त्याने बेन डोर्सिसला बाद केले. तो खाते न उघडताच बाद झाला.

राहुल गांधींनी निवडणुकीतील पराभव स्वीकारला

त्यानंतर कर्णधार मॅथ्यू वेडने 15 चेंडूत 22 धावांची खेळी केली. मात्र तो संघाला विजयासाठी 4 चेंडूत 10 धावा आवश्यक असताना शेवटच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर बाद झाला. त्याला अर्शदीप सिंगने बाद केले. तो बाद झाल्यावर ऑस्ट्रेलियाला 161 धावांचे लक्ष्य गाठता आले नाही. भारताकडून मुकेश कुमारने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर अर्शदीप सिंग आणि रवी बिश्नोई यांना प्रत्येकी 2 आणि अक्षर पटेलने 1 विकेट घेतली. या सामन्यात भारताच्या अक्षर पटेल याला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला आहे. तर रवी बिष्णोई याला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला.

One Comment on “पाचव्या टी-20 सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *