पर्थ, 25 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत विजयाचे खाते उघडले आहे. भारताने या मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी पराभव केला आहे. त्यामुळे 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने 1-0 अशी महत्वपूर्ण आघाडी घेतली. या विजयामुळे भारतीय संघाला मालिकेत आघाडी तर मिळालीच पण जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठा फायदा झाला आहे.
https://x.com/BCCI/status/1860957673816289549?t=wBswxB202w10daMKyqaLyw&s=19
जैस्वाल-कोहलीची शतके
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना पर्थ येथे खेळला गेला. या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी भारताचा पहिला डाव 150 धावांतच संपुष्टात आला. त्यानंतर भारताच्या भेदक गोलंदाजीपुढे ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 104 धावांवर गुंडाळला. त्यामुळे भारताला पहिल्या डावात 46 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली. त्यानंतर भारताने आपला दुसरा डाव 487 धावांवर घोषित केला. दुसऱ्या डावात भारताच्या फलंदाजांनी शानदार कामगिरी केली. दुसऱ्या डावात भारताच्या केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल यांनी पहिल्या विकेटसाठी 201 धावांची सलामी दिली. त्यावेळी केएल राहुल 77 धावा करून बाद झाला. त्यानंतर यशस्वी जैस्वालने 161 धावांची खेळी केली. तर विराट कोहलीने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 30 वे शतक झळकावून 100 धावा केल्या. याबरोबरच पहिलीच कसोटी खेळत असलेल्या नितिश रेड्डी याने 27 चेंडूत नाबाद 38 धावांची खेळी केली. त्यानंतर भारताने आपला दुसरा डाव 487 धावांवर घोषित केला.
ऑस्ट्रेलिया दुसरा डाव 238/10
विजयासाठी 534 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाची दुसऱ्या डावात देखील खराब सुरूवात झाली. पहिल्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर जसप्रीत बुमराहने नॅथन मॅकस्विनीला बाद केले. तो शून्यावर बाद झाला. त्यानंतर मोहम्मद सिराजने पॅट कमिन्सला आणि जसप्रीत बुमराहने मार्नस लॅबुशेनला बाद केले. त्यामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी ऑस्ट्रेलियाची 3 बाद 12 अशी नाजूक अवस्था झाली होती. त्यानंतर आजच्या दिवसाच्या दुसऱ्या षटकातच मोहम्मद सिराजने उस्मान ख्वाजाला बाद केले. त्यानंतर काही वेळात त्याने स्टीव्ह स्मिथला बाद केले. स्टीव्ह स्मिथ 60 चेंडूत 17 धावा करून बाद झाला. त्याचवेळी धोकादायक ठरत असलेल्या ट्रॅव्हिस हेडला जसप्रीत बुमराहने बाद केले. या डावात ट्रॅव्हिस हेडने 101 चेंडूत 89 धावा केल्या. हेडने मिचेल मार्शसोबत 82 धावांची भागीदारी केली. त्यानंतर मिचेल मार्शला नितिश रेड्डीने 47 धावांवर बाद केले. तसेच हर्षित राणाने ॲलेक्स कॅरीला 36 धावांवर बाद केले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचे उर्वरित फलंदाज लगेच बाद झाले. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 238 धावांत संपुष्टात आला आणि भारताने पहिल्या कसोटीत 295 धावांनी विजय मिळवला.
भारताची शानदार गोलंदाजी
या सामन्यात भारताचा कर्णधार जसप्रीत बुमराह प्लेअर ऑफ द मॅच ठरला. त्याने या सामन्यात पहिल्या डावात 5 विकेट आणि दुसऱ्या डावात 3 विकेट घेतल्या. त्याचबरोबर या सामन्यात मोहम्मद सिराजने एकूण 5 विकेट, हर्षित राणा याने 4, वॉशिंग्टन सुंदर 2 आणि नितिश रेड्डीने 1 विकेट घेतली.