भारतात एचएमपीव्ही संसर्गाचा पहिला रुग्ण: आठ महिन्यांच्या बाळाला संसर्ग?

बंगळुरू, 06 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) बंगळुरूमधील एका खाजगी रुग्णालयात आठ महिन्यांच्या बाळाला ह्युमन मेटाप्न्युमोव्हायरस (एचएमपीव्ही) संसर्ग झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. बाळाला त्रास जाणवू लागल्यानंतर त्याला बंगळुरूमधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या नमुन्यांची प्रयोगशाळेतील तपासणी प्रलंबित असून, या संसर्गाची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. तर बाळाच्या प्रकरणाशी संबंधित पुढील तपशील आणि प्रयोगशाळा चाचण्यांचे निष्कर्ष समोर आल्यावर अधिकृत माहिती जारी केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. यासंदर्भातील वृत्त पीटीआय वृत्तसंस्थेने दिले आहे.

https://x.com/PTI_News/status/1876135243645931566?t=UXFoHbJOGWQa1fSMkP01SA&s=19

चीनमध्ये संसर्ग वाढला

दरम्यान, चीनमध्ये सध्या एचएमपीव्ही चा संसर्ग झपाट्याने पसरत असून, त्याच पार्श्वभूमीवर भारतातील आरोग्य क्षेत्रात सतर्कता बाळगली जात आहे. चीनमधील वाढत्या प्रकरणांमुळे शेजारील देशांमध्येही संसर्गाची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे भारतात आरोग्य विभागाकडून सतर्कता बाळगली जात आहे. परंतु, या आजारावर कोणतेही लस किंवा विशिष्ट उपचार उपलब्ध नसल्यामुळे प्रतिबंधात्मक उपायांवर भर दिला जातो.

एचएमपीव्हीची लक्षणे कोणती?

एचएमपीव्ही हा श्वसनविषयक संसर्गजन्य व्हायरस आहे, जो लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि कमजोर प्रतिकारक्षमतेच्या लोकांमध्ये गंभीर आजाराचे कारण ठरू शकतो. सर्दी, खोकला, घसा खवखवणे, ताप, श्वसनाचा त्रास यांसारखी एचएमपीव्ही आजाराची लक्षणे आहेत. तर या आजाराच्या गंभीर प्रकरणांमध्ये ब्रॉन्कायटिस किंवा न्यूमोनिया होण्याची शक्यता असते. हा आजार संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या थेट संपर्काने किंवा खोकल्याने व शिंकण्याने हवेतील सूक्ष्म थेंबांद्वारे पसरतो.

प्रतिबंधात्मक उपाय:

एचएमपीव्ही चा संसर्ग टाळण्यासाठी मास्क वापरणे, हातांची स्वच्छता राखणे, हात साबण आणि पाण्याने स्वच्छ धुणे आणि संसर्गित व्यक्तींशी संपर्क टाळणे हे महत्त्वाचे आहे. तसेच, ताप किंवा श्वसन समस्या जाणवल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे, अशा सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. चीनमध्ये एचएमपीव्ही च्या वाढत्या प्रकरणांमुळे भारतात सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. तर ही परिस्थिती पुढील काही दिवसांमध्ये अधिक स्पष्ट होईल, असे सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *