ॲडलेड, 06 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावसकर ट्रॉफी या मालिकेतील दुसरा कसोटी सामना आजपासून (दि.06) खेळविण्यात येत आहे. हा सामना ऑस्ट्रेलियातील ॲडलेडमध्ये खेळवला जात आहे. हा कसोटी सामना दिवस-रात्र होणार असल्याने यामध्ये गुलाबी चेंडूचा वापर करण्यात आला आहे. तत्पूर्वी, भारतीय संघाने पर्थ येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत विजय मिळवल्याने भारत 5 सामन्यांच्या या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकून मालिकेत 2-0 ने आघाडी घेण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असणार आहे. या सामन्यात भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
https://x.com/BCCI/status/1864879758842216511?t=RFF-buyU0e0YVBvm5YVu0A&s=19
रोहित शर्माचे पुनरागमन
रोहित शर्मा आता भारतीय संघात परतला आहे. त्यामुळे तो आता भारताचा कर्णधार असणार आहे. परंतु, या सामन्यात रोहित शर्मा सलामीला येणार नाही. आजच्या सामन्यात यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल हे दोघे भारताच्या डावाची सुरूवात करणार आहेत. तसेच यावेळी रोहित शर्मा मधल्या फळीत फलंदाजी करणार आहे, याची माहिती रोहित शर्माने काल पत्रकार परिषदेत दिली होती.
भारतीय संघात 3 बदल
दरम्यान, रोहित शर्मा सध्या फलंदाजीच्या खराब फॉर्ममधून जात आहे. गेल्या काही सामन्यांत त्याला मोठ्या धावा करता आल्या नाहीत. त्यामुळे रोहित शर्माने मधल्या फळीत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यासाठी भारतीय संघात तीन बदल करण्यात आले आहेत. या सामन्यात देवदत्त पडिकल, ध्रुव जुरेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्याजागी रोहित शर्मा, शुभमन गिल आणि रविचंद्रन अश्विन यांचा समावेश करण्यात आला आहे. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड दुखापतीमुळे या सामन्याला मुकणार आहे. त्याच्याजागी स्कॉट बोलँड याला ऑस्ट्रेलियन संघाने खेळण्याची संधी दिली आहे.
गोलंदाजीला पोषक खेळपट्टी?
आजचा सामना ॲडलेडमध्ये दिवस-रात्र खेळविण्यात येणार आहे. या सामन्यासाठी गुलाबी चेंडू वापरण्यात आला आहे. ॲडलेडच्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना मदत मिळण्याची शक्यता आहे. या सामन्यात गुलाबी चेंडू डावाच्या सुरूवातीला स्विंग आणि सीम होण्याचा अंदाज आहे. तसेच रात्र झाल्यानंतर विद्युत प्रकाशात गुलाबी चेंडूवर फलंदाजी करणे फलंदाजांना अवघड जाणार आहे. मात्र, सामन्याच्या दुसऱ्या दिवसानंतर याठिकाणी फलंदाजांना मदत मिळेल, अशी अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत या सामन्याची खेळपट्टी कसा रंग दाखवणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
भारतीय संघ:-
यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रोहित शर्मा (कर्णधार), नितीश रेड्डी, रविचंद्रन अश्विन, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया संघ:- उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्विनी, मार्नस लबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लायन आणि स्कॉट बोलँड