बेंगळुरू, 16 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला बुधवार (दि.16) पासून सुरूवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. दरम्यान, या सामन्यात मुसळधार पावसाने व्यत्यय आणला आहे. त्यामुळे सध्या नाणेफेकीला विलंब झाला आहे. सध्या चिन्नास्वामीच्या मैदानावर कव्हर्स आहेत. तसेच याठिकाणी अजूनही मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे हा सामना कधी सुरू होणार? याकडे क्रिकेट रसिकांचे लक्ष लागले आहे.
या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपविण्यात आले आहे. या मालिकेसाठी भारतीय संघात अनुभवी खेळाडूंसोबत युवा खेळाडूंना देखील संधी देण्यात आली आहे. भारतीय संघाची फलंदाजी रोहीत शर्मा, विराट कोहली, रिषभ पंत, केएल राहुल, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल या खेळाडूंवर अवलंबून असणार आहे. तसेच रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन या खेळाडूंचा देखील संघात समावेश करण्यात आला आहे. या दोघांनी काही दिवसांपूर्वी झालेल्या बांगलादेश विरुद्धच्या मालिकेत चमकदार कामगिरी केली होती. त्यामुळे न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेसाठी त्यांच्याकडून याच अष्टपैलू कामगिरीची अपेक्षा केली जात आहे. सोबतच भारतीय संघात कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाश दीप या गोलंदाजांची निवड झाली आहे.
न्युझीलंडच्या कामगिरीकडे लक्ष
तर दुसरीकडे न्यूझीलंडचा संघ देखील तुल्यबळ आहे. परंतु, अलीकडेच झालेल्या श्रीलंका विरुद्धच्या दोन कसोटी सामन्यात न्यूझीलंडला पराभवाचा सामना करावा लागला होता. या मालिकेत श्रीलंकन फिरकी गोलंदाजांच्या समोर न्यूझीलंडच्या फलंदाजांना फार काही करता आले नाही. तसेच या मालिकेत न्यूझीलंडच्या गोलंदाजांना चमकदार कामगिरी करण्यात अपयश आले होते. या खराब कामगिरीमुळे न्यूझीलंड संघाचा श्रीलंकेकडून 2-0 असा पराभव झाला होता. अशा परिस्थितीत भारताच्या रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजासारख्या गोलंदाजांचा सामना करणे त्यांच्यासमोर खडतर आव्हान असणार आहे.
सामना कुठे पाहता येईल?
आजचा सामना सकाळी 9:30 वाजल्यापासून सुरू होणार होता. मात्र, मुसळधार पाऊस आल्यामुळे हा सामना सुरू होण्यास आणखी विलंब लागणार आहे. या मालिकेतील सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स18 चॅनल्स वर करण्यात येणार आहे. तसेच जिओ सिनेमा या ॲपवर देखील आपल्याला हा सामना लाईव्ह पाहता येईल.
भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि आकाश दीप.
न्यूझीलंड संघ: डेव्हॉन कॉनवे (यष्टीरक्षक), टॉम लॅथम (कर्णधार), विल यंग, केन विल्यमसन, मायकेल ब्रेसवेल, डॅरिल मिशेल, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, टॉम ब्लंडेल, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, टिम साऊदी, मॅट हेन्री, जेकब डफी, अजजाब पटेल आणि विल्यम ओ’रुर्के.