केपटाऊन, 03 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना आजपासून सुरू होणार आहे. हा सामना केपटाऊन येथील न्यूलँड्स मैदानावर खेळवला जाईल. याआधी हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरू होणार होता. मात्र, या सामन्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार, आजचा कसोटी सामना दुपारी 2 वाजल्यापासून खेळविण्यात येणार आहे. या मालिकेत भारतीय संघ 1-0 अशा पिछाडीवर आहे. त्यामुळे ही कसोटी जिंकून 2 सामन्यांच्या या मालिकेत बरोबरी साधण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असणार आहे.
https://twitter.com/BCCI/status/1741744282665402425?s=19
भारताचे कासोटी मालिका जिंकण्याचे स्वप्न अपुरे!
दरम्यान, भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेच्या भूमीत आजवर एकपण कसोटी मालिका जिंकली नाही. तत्पूर्वी, भारतीय संघाने पहिली कसोटी गमावली होती. त्यामुळे यावेळेस देखील आफ्रिकेच्या भूमीत कसोटी मालिका जिंकण्याचे स्वप्न अपुरेच राहिले आहे. तर आजचा कसोटी सामना केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर खेळविण्यात येणार आहे. या मैदानावरील भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक राहिलेली आहे. भारतीय संघाला या मैदानावर आजपर्यंत एकापण कसोटी सामन्यात विजय मिळवता आला नाही. त्यामुळे या मालिकेत बरोबरी साधण्यासाठी भारताला कठोर परिश्रम करावे लागणार आहेत.
तत्पूर्वी, केपटाऊनच्या न्यूलँड्सची खेळपट्टी गोलंदाजांना अनुकूल असणार आहे. याशिवाय फिरकीपटूंसाठी काही मदत होण्याची शक्यता आहे. तसेच वेगवान गोलंदाजांना खेळपट्टीवरून भरपूर वेग आणि उसळी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय फलंदाजांपुढे आफ्रिकेच्या गोलंदाजांचे तगडे आव्हान असणार आहे. दरम्यान आजच्या सामन्यात भारतीय संघात काही बदल होण्याची शक्यता आहे. रवींद्र जडेजा तंदुरुस्त झाला आहे. अशा परिस्थितीत त्याचे पुनरागमन निश्चित आहे. तसेच या सामन्यात आवेश खानला पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमा या कसोटीत खेळणार नाही. अशा परिस्थितीत या कसोटीत डीन एल्गर दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व करेल. तर डीन एल्गरचा हा त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील अखेरचा कसोटी सामना आहे.

भारतीय संघ:-
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अभिमन्यू ईसवरन, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रसिध कृष्णा, मुकेश कुमार, आवेश खान आणि मोहम्मद सिराज.
दक्षिण आफ्रिका संघ:-
डीन एल्गर (कर्णधार), टोनी डी जिओर्गी, एडन मार्कराम, कीगन पीटरसन, झुबेर हमझा, मार्को जॅन्सन, विआन मुल्डर, डेव्हिड बेडिंगहॅम (विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स (विकेटकीपर), काइल वेरेन (विकेटकीपर), नांद्रे बर्गर, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी, जेराल्ड कोएत्झी.