नाशिक, 20 मे: (विश्वजीत खाटमोडे) राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघात आज पाचव्या टप्प्यात मतदान सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावर आज सकाळपासूनच लोकांच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात देखील आज मतदान होत आहे. नाशिकमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे उमेदवार हेंमंत गोडसे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजाभाऊ वाजे आणि अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांच्यात तिरंगी लढत आहे.
https://twitter.com/ANI/status/1792398196091814194?s=19
शांतीगिरी महाराज चर्चेत
नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांनी आज सकाळी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी शांतीगिरी महाराजांनी मतदान केल्यानंतर ईव्हीएम मशीनला हार घातला. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. दरम्यान, ईव्हीएम मशीनला हार घातल्याप्रकरणी शांतीगिरी महाराज यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ईव्हीएम मशीनची पुजा केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे शांतीगिरी महाराज चर्चेत आले असून, त्यांच्या विरोधात कोणती कारवाई होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
https://x.com/ANI/status/1787841440397111761
यापूर्वी रुपाली चाकणकर अडचणीत
दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी मतदान पार पडले. यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मतदानापूर्वी पुण्यातील एका मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीनची पुजा केल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात पुण्यातील पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली होती.