महाराष्ट्र राज्य प्रधानमंत्री आवास योजना शहर स्तरीय तांत्रिक तज्ञ कर्मचारी संघटनेचा बेमुदत संप

मुंबई, 10 सप्टेंबर: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्र राज्य प्रधानमंत्री आवास योजना शहर स्तरीय तांत्रिक तज्ञ कर्मचारी संघटनेच्या वतीने बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. विविध मागण्यांसाठी हे आंदोलन केले जात आहे. शहरस्तरीय तांत्रिक तज्ञ कर्मचारी संघटनेच्या मुलभूत प्रश्न व मागण्यांवर दुर्लक्ष होत असून राज्यातील महानगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायत अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) या योजनेची अंमलबजावणी शहरस्तरीय तांत्रिक कक्षामार्फत 2018 पासून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर या कर्मचाऱ्यांकडून विविध मागण्या सरकार समोर मांडण्यात आल्या होत्या.

काय आहेत मागण्या?

त्यामध्ये शहरस्तरीय तांत्रिक कक्षातील कर्मचारी यांना मागील 6 वर्षापासून वेतनवाढ दिलेली नाही. ही वेतन वाढ करावी. सदर कर्मचारी हे सहा ते सात वर्षांपासून या योजनेमध्ये काम करून देखील कोणत्याही प्रकारचे मनुष्यबळ धोरण लागू करण्यात आलेले नाही. यासाठी सरकारकडे वारंवार पाठपुरावा करून देखील कोणत्याही प्रकारची मनुष्यबळ धोरणाची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. शहरस्तरीय तांत्रिक कक्षातील कर्मचारी यांना सरकारी सेवेत सामावून घ्यावे.



केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार डिसेंबर 2024 अखेरीस योजना संपुष्टात आल्यानंतर व प्रधानमंत्री आवास योजना भाग-2 ची अंमलबजावणी सुरू होणार असून ज्या नगरपालिकेचे नवीन प्रकल्प नसतील अथवा जुने प्रस्ताव पूर्ण झाले असतील तेथील कर्मचाऱ्यांना कार्य मुक्त न करता त्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या इतर योजनांमध्ये‌ सामावून घेऊन 58 वर्षांपर्यंत काम करण्याची संधी मिळावी याबाबत हमी देण्यात यावी. शहरस्तरीय तांत्रिक तज्ञ कक्षातील सर्व महिला कर्मचारी यांना प्रसूती रजा लागू करावी, सदरील कर्मचारी यांना अंशकालीन कर्मचारी म्हणून ग्राह्य धरून सरकारी भरतीमध्ये राखीव आरक्षण ठेवण्यात यावे. सरकारने सणांच्या सुट्ट्यांसाठी धोरण तयार करावे. आदी मागण्यासाठी हा बेमुदत संप करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *