इंदापूर, 18 जुलैः अद्याप इंदापूर तालुक्यात म्हणावा तितका समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीला सिंचनासाठी पाण्याची मोठ्या प्रमाणात गरज आहे. ही बाब लक्षात घेऊन इंदापूर तालुक्यातील तब्बल 14 तलाव भरण्यासाठी तसेच शेती सिंचनासाठी लवकरच खडकवासला कालव्याचे पाणी पोहोचणार आहे, अशी माहिती माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
यावेळी भरणे यांनी सांगितले की, इंदापूर तालुक्यातील खडकवासला कालव्याच्या लाभ क्षेत्रातील पाझर तलाव भरण्यासाठी आपण आज, 18 जुलै रोजी पुणे विभागाचे अधीक्षक अभियंता संजीव चोपडे यांची भेट घेतली. तसेच खडकवासला कालव्यातून इंदापूरसाठी पाणी सोडण्याच्या सूचना त्यांना दिल्या. या सूचनेनुसार चोपडे यांनी खडकवासला प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांना इंदापूर तालुक्यातील पाझर तलाव भरण्याच्या सूचना दिल्या आहेत.
यानुसार इंदापुर तालुक्यातील तलाव भरण्यासाठी पाणी सोडले जाणार आहे. हे पाणी इंदापूर तालुक्यात प्रत्यक्षात येत्या काही दिवसात पोहोचणार आहे. त्यानंतर लगेचच तालुक्यातील तलाव भरण्यास सुरुवात केली जाणार आहे. मात्र तालुक्यामध्ये अपेक्षित पाऊस झालेला नसल्याने विहिरी आणि कुपनलिका यांच्या पाणी पातळीत वाढ झालेली नाही. याशिवाय सध्या तालुक्यातील या कालव्याच्या लाभ क्षेत्रातील सर्व तलावही पाण्याअभावी कोरडे आहेत.