इंदापूर, 18 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्रात एकीकडे मराठा आणि ओबीसी समाज आरक्षणासाठी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच राज्यातील धनगर समाज देखील आरक्षणासाठी आंदोलन करताना दिसत आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी चंद्रकांत वाघमोडे हे बारामती येथे आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी धनगर समाजाच्या वतीने पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे आज बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला इंदापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे इंदापूर शहरातील दुकाने आज सकाळपासूनच बंद होती. या पार्श्वभूमीवर, इंदापूर शहरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
गेल्या धनगर समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी चंद्रकांत वाघमोडे हे काही दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, अशी त्यांची मागणी आहे. त्यांच्या उपोषणाचा आज दहावा दिवस आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र, जोवर मुख्यमंत्री किंवा त्यांचे प्रतिनिधी चर्चा करण्यासाठी येत नाहीत, तोपर्यंत आपण हे उपोषण मागे घेणार नाही, असा निर्धार चंद्रकांत वाघमोडे यांनी केला आहे.
तर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वी उपोषणकर्ते चंद्रकांत वाघमोडे यांची भेट घेतली होती. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी या आंदोलनासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधला होता. त्यामुळे आता धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न राज्य सरकार कशाप्रकारे सोडविणार? याकडे धनगर समाजाचे लक्ष लागले आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वी चंद्रकांत वाघमोडे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी धनगर समाजाच्या वतीने बारामती शहरात बंद पुकारण्यात आला होता. या बंदला बारामतीकरांनी देखील उस्फुर्त प्रतिसाद दिला होता.
One Comment on “धनगर समाजाच्या वतीने आज इंदापूर बंद”