पाणीपट्टीत वाढ हे पाप महाविकास आघाडी सरकारचे, देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

मुंबई, 22 जून: (विश्वजीत खाटमोडे) काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे फडणवीस सरकारवर शेतकऱ्यांची पाणीपट्टी वाढवल्याचा आरोप केला होता. राज्य सरकारने राज्यातील बागायतदार शेतकऱ्यांची पाणीपट्टीत 10 टक्क्यांनी वाढ केली. तर, कोरडवाहू शेतकऱ्यांच्या पाणीपट्टी दरात 7 टक्क्यांची वाढ केली असल्याचे नाना पटोले म्हणाले होते. त्यांच्या या आरोपांना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ही दरवाढ महाविकास आघाडीच्या काळातच झाली असल्याचे यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. हे पाप महाविकास आघाडी सरकारचे आहे आणि शेतकर्‍यांवर कोणताही भूर्दंड पडू नये, म्हणून त्यावर स्थगिती देण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. तसेच याप्रसंगी देवेंद्र फडणवीस यांनी त्यासोबत जलसंपदा विभागाचे परिपत्रक प्रसिद्ध केले.

https://x.com/Dev_Fadnavis/status/1804438034542133741?s=19

देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर

काँग्रेसने आता बातमी पसरविली की, आताच्या सरकारने पाणीपट्टीत 10 पट वाढ केली. 10 पट वाढ केली. पण, खरोखर ही वाढ केली कुणी? 29 मार्च 2022 रोजी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधीकरणाने एक आदेश जारी केला. त्यानुसार ही दरवाढ झाली. ही संपूर्ण दरवाढ महाविकास आघाडीच्या काळातच झाली असून, आता तेच आमच्यावर आरोप करतात, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोले यांच्या आरोपाला उत्तर दिले.

फडणवीस यांनी काय म्हटले?

2018 मध्ये प्रवाही आणि खाजगी उपसा सिंचनाचे दर वेगवेगळे होते. मात्र 2022 मध्ये खाजगी उपसासाठी स्वतंत्र दर न देता, प्रवाहीचेच दर लागू करण्यात आले. त्यामुळे 500 ची वाढ 5000 रुपये झाली. हे पाप महाविकास आघाडी सरकारचे आहे. शेतकर्‍यांवर कोणताही भूर्दंड पडू नये, म्हणून त्यावर स्थगिती देण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या आठवड्यातच त्यासंदर्भातील कार्यवाही पूर्ण होईल, अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली. माझी माध्यमांनाही विनंती आहे की, निवडणुकीत विरोधक फेक नरेटिव्हसाठी बातम्या देत राहतील. पण, त्याची खातरजमा होणे आवश्यक आहे. आता राज्यातील जनतेनेच ठरवावे, सुलतानी सरकार कोणते होते? असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *