पुणे, 20 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) पुणे जिल्ह्यातील वीर धरण क्षेत्रात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे वीर धरणाच्या पाणी पातळीत वाढ होताना दिसत आहे. तसेच भाटघर धरणातून सध्या पाण्याचा विसर्ग वाढत असल्याने वीर धरणात पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे.
पहा व्हिडिओ –
या पार्श्वभूमीवर, वीर धरणातून नीरा नदीत सध्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यानुसार, सोमवारी (दि.19 ऑगस्ट) रात्री 9 वाजता वीर धरणाच्या सांडव्याद्वारे नीरा नदीमध्ये 32 हजार 459 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
एकूण 32609 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग
तसेच वीर धरणाच्या नीरा डाव्या कालव्याच्या अतिवाहका द्वारे सुरू असलेला 150 क्युसेक्सचा विसर्ग तसाच ठेवण्यात आला आहे. त्यामुळे नीरा नदीमध्ये येत्या काळात एकूण 32 हजार 609 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग होणार आहे. तरी, पावसाचे प्रमाण आणि पावसाची तीव्रता यांचा अंदाज घेऊन विसर्गामध्ये बदल करण्यात येईल. त्यामुळे नदीकाठच्या परिसरातील नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. कोणतीही अनुचित घटना घडल्यास, त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधितांची राहील, अशा सूचना नीरा उजवा कालवा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिल्या आहेत.