पुणे, 03 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) जोरदार पावसामुळे नीरा खोऱ्यातील सर्वच धरणांच्या पाणीसाठ्यात आता झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे नीरा खोऱ्यातील गुंजवणी, निरा देवघर, वीर, भाटघर या धरणांतून सध्या पाण्याचा विसर्ग केला जात आहे. तरी पावसाचे प्रमाण व तीव्रता लक्षात घेता विसर्गामध्ये बदल करण्यात येईल, अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. तसेच कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधितांची राहील, अशी सूचना नीरा उजवा कालवा फलटण विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिली आहे.
धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ
दरम्यान, शुक्रवारी (दि.02) सायंकाळी 5 वाजता नीरा देवघर धरण 94.65 टक्के, भाटघर धरण 99.11 टक्के, गुंजवणी धरण 86.11 टक्के भरली होती. त्यामुळे या तिन्ही धरणांतून पाण्याचा विसर्ग वाढण्यास सुरूवात झाली. यामध्ये काल रात्री 10.30 वाजता भाटघर धरणातून नीरा नदीत 13 हजार 531 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला.
वीर धरणातून पाण्याचा विसर्ग
त्याचवेळी नीरा देवघर धरणातून 4 हजार 538 क्युसेक आणि गुंजवणी धरणातून 2 हजार 174 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला. यासोबतच वीर धरणात देखील मोठ्या प्रमाणात पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे वीर धरणातून काल रात्री 10.30 वाजता 42 हजार 983 क्युसेकने पाण्याचा विसर्ग नीरा नदीपात्रात सोडण्यात आला आहे. याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे.