दिल्ली, 21 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) भारतात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 358 नवीन सक्रिय रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 300 रुग्ण एकट्या केरळमध्ये आढळले आहेत. त्यामुळे केरळ राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता 2 हजार 341 वर पोहोचली आहे. तर भारतातील कोरोना रुग्णांची संख्या 2 हजार 669 इतकी झाली आहे. याशिवाय देशात कालच्या दिवशी कोरोनामुळे 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यांतील 3 रुग्ण हे केरळमधील आहेत. तर केरळमध्ये गेल्या 24 तासांत 211 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. त्याबरोबर भारतातील 230 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. याबाबतची आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केली आहे.
https://twitter.com/ani_digital/status/1737694880594378840?s=19
महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 10 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 45 वर पोहोचली आहे. तसेच गेल्या 24 तासांत तामिळनाडूमध्ये 12 आणि कर्नाटकात 13 नवे रुग्ण आढळले आहेत. याशिवाय महाराष्ट्रातील सिंधुदुर्गात एका 41 वर्षीय व्यक्तीला कोरोनाच्या JN.1 या नव्या व्हेरियंटची लागण झाल्याचे आढळून आले आहे. यासंदर्भात महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्य सरकार परिस्थितीला तोंड देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.
दरम्यान, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी बुधवारी भारतातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एक उच्चस्तरीय बैठक घेतली होती. कोरोनाच्या JN.1 या नव्या व्हेरियंट संदर्भात सतर्क राहण्याच्या सूचना त्यांनी यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या. सर्व राज्यांनी कोरोना बाबत सतर्क राहावे. राज्यांनी कोरोना रुग्णांवर लक्ष ठेवावे. तसेच राज्यातील औषधे, ऑक्सिजन सिलिंडर, कॉन्सन्ट्रेटर, व्हेंटिलेटर आणि लसी यांचा पुरेसा साठा सुनिश्चित करण्याचे आवाहन मनसुख मांडविया यांनी केले आहे.