मुंबई, 08 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) राज्यातील वीज अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यानुसार, राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित (महानिर्मिती), महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (महावितरण) व महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित (महापारेषण) या वीज कंपन्यांतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वेतनात आणि भत्त्यांमध्ये अनुक्रमे 19 आणि 25 टक्क्यांची वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
https://x.com/Dev_Fadnavis/status/1809933736248545674?s=19
वेतनात 19 टक्के, भत्त्यात 25 टक्के वाढ
तत्पूर्वी, देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी मुंबईतील सह्याद्री अतिथी गृहात एक बैठक पार पडली. या बैठकीला ऊर्जा विभागाच्या वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत वीज कर्मचारी व अधिकाऱ्यांचे वेतन पुनर्निर्धारण करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीनही वीज कंपन्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मूळ वेतनात मध्ये 19 टक्के व सर्व भत्त्यांमध्ये 25 टक्के वाढ केली असल्याचे जाहीर केले.
सोबतच सहाय्यकांना परिविक्षाधीन कालावधी करीता 5 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तसेच तांत्रिक कर्मचाऱ्यांना मिळणारा भत्ता 500 रुपयांवरून 1000 रुपये करण्यात आल्याची ही माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली. दरम्यान, राज्य सरकारने वेतनात आणि भत्त्यांमध्ये वाढ केल्यामुळे याचा फायदा तीनही वीज कंपन्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना होणार आहे.