दिल्ली, 14 सप्टेंबर: (विश्वजीत खाटमोडे) केंद्र सरकारने कच्च्या स्वरूपातील पाम, सोयाबीन आणि सूर्यफूल तेलावरील मूळ सीमाशुल्क शून्यावरून 20 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील माहिती अर्थ मंत्रालयाने दिली आहे. त्यानुसार, कच्च्या स्वरूपातील पाम तेल, सोयाबीन आणि सूर्यफूल तेलावरील मूळ आयात शुल्क शून्यावरून 20 टक्के करण्यात आले आहे. तसेच रिफाईंड सोयाबीन तेल, पाम तेल आणि सूर्यफूल तेलावरील आयात शुल्कात 32.5 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
https://x.com/dhananjay_munde/status/1834783689814728952?s=19
आयात शुल्कात वाढ करण्याची मागणी
यापूर्वी कच्चे पाम तेल, सोयाबीन तेल आणि सूर्यफुल तेलाच्या आयातीवर 5.5 टक्के आणि रिफाईंड तेलावर 13.75 टक्के आयात शुल्क होते. याचा फटका तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना बसत होता. त्यामुळे खाद्यतेल आयात शुल्कात करावी, अशी मागणी तेलबिया उत्पादक शेतकरी सातत्याने करीत होते. या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने देखील केंद्राकडे खाद्यतेलांच्या आयात शुल्कात वाढ करण्याची मागणी केली होती. त्यानुसार केंद्र सरकारने ही मागणी मान्य करीत खाद्यतेलावरील आयात शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्राच्या या निर्णयाबद्दल राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
धनंजय मुंडे यांनी मानले आभार
राज्यात सोयाबीनचा पेरा 52 लाख हेक्टर पेक्षा जास्त झाला असल्याने तसेच यावर्षी पाऊस पाणी व्यवस्थित झाले असल्याने सोयाबीनचे उत्पन्न बंपर होणार आहे. अशावेळी शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा, यासाठी मी केंद्राकडे सातत्याने 3 मागण्या करत आहे. त्यामध्ये सोयाबीनची हमीभावाने खरेदी करावी, खाद्यतेल, सोया मिल्क, सोया केक इत्यादी उत्पादने आयात करण्यास शुल्क लावावे आणि सोयाबीन निर्यातीसाठी प्रत्येक क्विंटलमागे किमान 50 डॉलर इतके अनुदान द्यावे. अशा मागण्यांचा समावेश आहे.
केंद्र सरकारने यापैकी हमीभावाने खरेदी ही मागणी मान्य केली असून 90 दिवस खरेदी केली जाणार आहे. त्यासोबतच आता खाद्यतेलावरील आयात शुल्क 20 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही केलेल्या 3 पैकी 2 मागण्या मान्य केल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चौहान, केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल तसेच या निर्णयासाठी सातत्याने आग्रह धरणारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे मनस्वी आभार. असे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.