आग्रा, 19 मे: (विश्वजीत खाटमोडे) उत्तर प्रदेशातील आग्रा येथे इन्कम टॅक्स विभागाने मोठी कारवाई केली आहे. तीन चप्पल व्यापाऱ्यांच्या ठिकाणांवर इन्कम टॅक्स विभागाने छापे टाकले. यामध्ये त्यांना करोडो रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळून आली. या कारवाईत इन्कम टॅक्स विभागाने तीन वेगवेगळ्या व्यापाऱ्यांकडून 60 कोटींहून अधिक रुपयांची रोकड जप्त केली आहे. तर अजूनही नोटांची मोजणी सुरू असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान इतक्या मोठ्या प्रमाणात बेहिशेबी रक्कम आढळल्याने देशात एकच खळबळ उडाली आहे. तर या सर्व व्यापाऱ्यांनी जमीन आणि सोन्यात गुंतवणूक केल्याची माहिती मिळाली आहे.
https://twitter.com/ddsahyadrinews/status/1792159169669161005?s=19
https://twitter.com/ANINewsUP/status/1792056641183223887?s=19
मोठ्या प्रमाणात बेहिशेबी रक्कम जप्त
या चप्पल व्यापाऱ्यांच्या घरात एकूण 100 कोटींहून अधिक रक्कम असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यावेळी इन्कम टॅक्स विभागाने आग्रा येथील एमजी रोड परिसरातील बीके शूज, धाकरण येथील मांशु फूटवेअर आणि हिंग मंडीच्या हरमिलाप ट्रेडर्स या ठिकाणी एकाचवेळी छापे टाकले. या कारवाईत मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली आहे. तसेच याठिकाणी बँकांकडून नोटा मोजण्याचे अनेक यंत्र मागवण्यात आले आहे. या जप्त केलेल्या नोटांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
चुकवेगिरी केल्याचे उघड
सोबतच या कारवाईत अनेक कागदपत्रेही सापडली आहेत. यामध्ये या व्यापाऱ्यांनी कर चुकवेगिरी केल्याचे उघडकीस आले आहे. या कागदपत्रांची छाननी इन्कम टॅक्स विभागाकडून केली जात आहे. इन्कम टॅक्स विभागाच्या या तपासात आग्रा, लखनौ, कानपूर, नोएडा येथील पथके सहभागी आहेत. इन्कम टॅक्स विभागाच्या पथकात 30 हून अधिक वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यावेळी इन्कम टॅक्स विभागाने तिन्ही चप्पल व्यापाऱ्यांकडून त्यांचे लॅपटॉप, संगणक आणि मोबाईल फोन जप्त केले आहेत. ते सध्या त्याचा डेटा मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत.